भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 12:39 IST2025-04-10T12:38:49+5:302025-04-10T12:39:35+5:30
पणजीतील मेळाव्यात कार्यकर्त्यांना विधानसभेच्या तयारीची केली सूचना

भाजपचे ५२ टक्के मतांचे लक्ष्य: मुख्यमंत्री
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यात भाजप वाढविण्यात कार्यकर्त्यांचाच मोठा हात आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावरच पक्षाची यशस्वी वाटचाल सुरू आहे. त्यामुळे २०२७ मध्ये विधानसभा निवडणुकीत हेच कार्यकर्ते राज्यात पुन्हा भाजपची सत्ता आणतील, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ५२ टक्के मते भाजप मिळवेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
बुधवारी पणजीत उत्तर गोवा भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद तानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, मंत्री रोहन खंवटे, आमदार, डिलायला लोबो, जेनिफर मोन्सेरात व इतर भाजपचे नेते उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, भाजपचे कार्यकर्ते हेच भाजपचे नेते आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. '२७ पार'ची घोषणा आपणाला सत्यात आणायची आहे. त्यासाठी सरकारच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवा. त्यांना योजनांचा लाभ मिळवून देण्यास मदत करा, असे आवाहनही त्यांनी केले.
भाजप सरकार अंत्योदय तत्त्वावर काम करत आहे. हे सरकार युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती व गरीब कल्याणावर चालत आहे. गेल्या काही वर्षांत भाजपने सर्व क्षेत्रांत विकास केला आहे. स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यासाठी सर्व पंचायतीमध्ये स्वयंपूर्ण मित्रांची नेमणूक केली आहे. या योजनेचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे कार्यकर्त्यांचे आहे. सरकारने केलेल्या कामाची आठवण लोकांना करून द्या, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांवर पक्ष कधीच अन्याय करत नाही: दामू
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले, भाजप पक्षाने २०२७ विधानसभा निवडणुकीमध्ये ४० मतदारसंघ लढवून मतांची टक्केवारी ५२ टक्क्यांवर नेण्याचा आमचा संकल्प आहे. यासाठी आता सर्व भाजप कार्यकर्त्यांची मदत लागणार आहे. सर्व कार्यकर्त्यांनी पक्ष मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे. भाजप जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करणारा पक्ष आहे. कार्यकर्त्यांवर पक्ष कधीच अन्याय करत नाही. म्हणून भाजपचे सर्वांत जास्त कार्यकर्ते राज्यात आहेत, असेही नाईक म्हणाले.
विधानसभेला २७ पेक्षा जास्त जागा मिळवू
मुख्यमंत्री म्हणाले, पुढील विधानसभा निवडणुकीत ५२ टक्क्यांपेक्षा अधिक मते आणि २७पेक्षा जास्त जागा मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची ठरणार आहे. याच कार्यकर्त्यांनी आमच्या सरकारी योजना या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवाव्यात. तसेच कार्यकर्त्यांनी आतापासून पुढच्या निवडणुकीच्या कामाची तयारी केली तर पुढील निवडणुकीत भाजपचे ध्येय साकारणे सोपे होईल.