झेडपी निवडणुकीत ८० टक्के नवे चेहरे येतील; भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 07:56 IST2025-10-14T07:56:57+5:302025-10-14T07:56:57+5:30
'लोकमत' कार्यालयात वार्तालापात निवडणुकीबाबत केले भाष्य.

झेडपी निवडणुकीत ८० टक्के नवे चेहरे येतील; भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितले
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप उमेदवार म्हणून ८० टक्क्यांपेक्षा जास्त नवीन चेहरे देईल, असे प्रदेशाध्यक्ष दामोदर उर्फ दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे. 'लोकमत' कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ते बोलत होते. दामू म्हणाले की, 'नवीन चेहरे देण्याला पक्षाचे प्राधान्य असून ८० ते १०० टक्केदेखील नवीन उमेदवार असू शकतात. जिल्हा पंचायतींवर बहुमताने भाजपचाच झेंडा फडकेल.
जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर लढवल्या जातात याचे दामू यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, 'अन्यथा ग्रामपंचायतींप्रमाणे जिल्हा पंचायतींमध्येही संगीत खुर्चीचा खेळ झाला असता. यावेळी जिल्हा पंचायतींमध्ये आम्ही 'रचने' प्रमाणे प्रयोग करणार आहोत. 'तिच विटी, तोच दांडू' असे आम्हाला नको. नवीन चेहरे असणे अत्यंत गरजेचे आहे. ८० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत नवीन उमेदवार असू शकतात. पक्ष याबाबत योग्य तो निर्णय घेईल. जुन्या लोकांना नवीन जबाबदाऱ्या देऊ.
'गुंडांशी संबंध लावणे चुकीचे'
दामू एका प्रश्नावर म्हणाले की, 'रामा काणकोणकर हल्लाप्रकरणाशी संबंधित गुंडांशी आपला संबंध लावला जातो, ते चुकीचे आहे. चॉप्सी याला मी ओळखत देखील नाही. वाढदिवसाला कोणी येऊन शुभेच्छा दिल्या तर कसे रोखणार? वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाची पार्श्वभूमी तपासणे अशक्य आहे. कार्यक्रमाला गालबोट लावण्यासाठी विरोधकांकडून झालेला तो प्रयत्न होता. मंदिरात केक कापला म्हणून विरोधकांनी माझ्यावर टीका केली. केक मंदिरात नव्हे तर मंडपात कापला होता. तो शाकाहारी होता. हा मंडप कार्यक्रमासाठी भाड्याने दिला जातो व तेथे वाढदिवसाच्या अनेक पार्ट्या होतात. विरोधकांनी केवळ बाऊ केला.'
जुन्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार
एका प्रश्नावर म्हणाले दामू म्हणाले की, 'भाजपपासून दूर गेलेल्या जुन्या कार्यकर्त्यांना परत आणण्यासाठी जिल्हा. पंचायत निवडणुकीपूर्वी बैठक होईल. काही रुसवे, फुगवे असतील तर ते दूर करू. काहीजण कोणी बोलावतात का या प्रतीक्षेत आहेत.
'पक्षात आता बऱ्यापैकी शिस्त'
दामू म्हणाले की, 'पक्षात आता बऱ्यापैकी शिस्त आलेली आहे. पूर्वी संघटनमंत्री हा मुख्य असायचा, तोच सर्व काही सांभाळायचा. गोव्यात आता प्रदेशाध्यक्ष हाच संघटनमंत्री आहे. प्रत्येक गोष्टीवर मी बारकाईने नजर ठेवून आहे. पक्षात बेशिस्त मुळीच खपवून घेतली जात नाही.'