परदेशातील गोमंतकीयांची भाजपाने माफी मागावी - दिगंबर कामत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2020 19:54 IST2020-10-21T19:53:25+5:302020-10-21T19:54:44+5:30
Digambar Kamat : विदेशातील गोमंतकीयांना गोव्याच्या समस्यांवर भाष्य करण्याचा व आपले मत प्रदर्शन करण्याच्या पूर्ण अधिकार आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.

परदेशातील गोमंतकीयांची भाजपाने माफी मागावी - दिगंबर कामत
मडगाव: परदेशात वास्तव्यास असलेल्या प्रत्येक गोमंतकीयास आपली मातृभूमी गोव्याचा सार्थ अभिमान आहे. विदेशात नोकरी-व्यवसाय करणारे गोमंतकीयांचे गोव्यासाठी खूप मोठे योगदान आहे. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विदेशातील गोमंतकीयांना 'बेडके' असे संबोधित करून त्यांचा अपमान केला आहे. भाजपाने त्वरीत हे विधान मागे घेऊन त्यांची जाहीर माफी मागावी अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केली आहे.
विदेशात वास्तव्यास असणाऱ्या गोमंतकीयांच्या गोव्याच्या हिताच्या विधायक सूचना समजून घेणे सरकारचे कर्तव्य आहे. विदेशातील गोमंतकीयांना गोव्याच्या समस्यांवर भाष्य करण्याचा व आपले मत प्रदर्शन करण्याच्या पूर्ण अधिकार आहे, असे कामत यांनी म्हटले आहे.
विदेशात नोकरी-व्यवसाय करुन आपले पोट भरणारे गोमंतकीय येथे गोव्यात राहणाऱ्या आपल्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात देतात, याची जाणीव सर्वांनी ठेवणे गरजेचे आहे. गोव्याची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी ते नेहमीच मदत करतात व विदेशी चलन मिळवीण्यास योगदान देतात. हे भाजपा सरकारने ध्यानात ठेवावे, असे कामत म्हणाले.
गोव्यातील भाजपाने विदेशातील काबाड कष्ट करुन रोजी-रोटी करणाऱ्या गोमंतकीयांच्या प्रती नेहमीच सापत्न वागणुकीचे धोरण ठेवले आहे. आज, निवृत्त झालेले दर्यावर्दी तसेच खलाशांच्या विधवांवर पेंशन मिळविण्यासाठी सरकारकडे भिक मागण्याची वेळ भाजपाने आणली आहे. भाजपा नेहमीच खलाशांच्या प्रती असंवेदनशील राहिले आहे, असा दावा कामत यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यांच्यावेळी तेथील भारतीय डायस्पोरांसमोर भाषण करुन आपली जाहिरातबाजी करतात. हे स्थानिक भाजपा नेत्यांनी लक्षात ठेवावे. भाजपा त्यांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी करते का? असा प्रश्न कामत यांनी विचारला आहे.