मगोपशी युतीबाबत भाजप सकारात्मक: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 08:12 IST2025-10-14T08:11:42+5:302025-10-14T08:12:22+5:30
'लोकमत' कार्यालयास सदिच्छा भेट

मगोपशी युतीबाबत भाजप सकारात्मक: भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत मगोपशी युतीबाबत भाजप सकारात्मक आहे, असे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी स्पष्ट केले आहे. 'लोकमत' कार्यालयास दिलेल्या सदिच्छा भेटीवेळी वार्तालापात ते बोलत होते.
नाईक म्हणाले की, 'मगो हा भाजपसाठी समविचारी पक्ष आहे. त्यामुळे युतीबाबत आमचा पक्ष सकारात्मक आहे. याबाबत योग्य वेळ येताच योग्य तो निर्णय जाहीर करू. एका प्रश्नावर नाईक म्हणाले की, 'भाजपपासून काही ना काही कारणांमुळे दुरावलेले जुने नेते, कार्यकर्त्यांना पुन्हा पक्षात आणले जाईल. ५९३ जणांची यादी आम्ही तयार केलेली आहे. दुरावलेले अनेकजण पक्षात परतू लागले आहेत. येणाऱ्या काळात आणखी काहीजण स्वगृही परततील.'
दामू म्हणाले की, 'विरोधकांबाबत गोव्याचे लोक शिक्षित जाणून आहेत. दरोडेखोरांच्या हातात लोक सत्ता देणार नाही. २०२७ मध्ये भाजपचेच सरकार येणार हे निश्चित आहे.' प्रदेशाध्यक्ष नाईक म्हणाले की, 'मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल दरमहा रिपोर्ट पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांना पाठवला जातो.
शिवाय, पक्षाच्या केंद्रीय नेत्यांचीही वेगळी यंत्रणा असून तेदेखील गोव्यातील माहिती घेत असतात व तो अहवाल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षांना देत असतात. सरकारच्या कामगिरीवर पक्ष म्हणून आमची नजर कायम असते.'
भाजपला फरक पडणार नाही
एका प्रश्नावर नाईक म्हणाले की, '२०२७ च्या निवडणुकीत विरोधक एकी करुन लढले तरी भाजपला कोणताही फरक पडणार नाही. डाव, प्रतिडाव अखेरच्या क्षणी ठरत असते. त्यावेळीची स्थिती व मागणी लक्षात घेऊन योग्य तो निर्णय घेऊ. मगोपशी युतीबाबत आमचे उत्तर 'हो' असेच आहे.
'माझे घर'चा मोठा दिलासा
'माझे घर' योजनेचे दामू यांनी जोरदार स्वागत केले. ते म्हणाले की, 'ही योजना आणण्यामागे सरकारचा अत्यंत चांगला हेतू असून लोकांना दिलासा मिळेल. ते म्हणाले की, 'पंतप्रधान घरकूल योजना करुन लोकांना घरे दिली जातात ती जमीन सरकारचीच असते. गृहनिर्माण मंडळ भूखंड करुन विकतो ती जमीनही सरकारची. मग सरकारी, कामुदनिदाद जमिनींमधिल घरे अधिकृत करण्यास काय हरकत आहे?