राज्यात रात्री बारानंतर नाइट लाइफ नको, आध्यात्मिक पर्यटन वाढवूया; भाजपा मंत्र्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 09:34 IST2025-12-16T09:34:14+5:302025-12-16T09:34:14+5:30
'नाइट क्लब'ना मंत्र्यांचाही विरोध

राज्यात रात्री बारानंतर नाइट लाइफ नको, आध्यात्मिक पर्यटन वाढवूया; भाजपा मंत्र्यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नाईट क्लबविरोधात आता राज्यातील मंत्री उघडपणे आपले मत व्यक्त करू लागले आहेत. रात्री १२ नंतर गोव्यात नाईट लाइफ नकोच, अशी भूमिका आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी घेतली आहे. हडफडें येथे 'बर्च बाय रोमियो लेन' नाईट क्लबला आग लागल्यानंतर हा विषय ऐरणीवर आला आहे.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी २०१४ मध्ये मंत्री असतानाही त्यांनी गोव्यात पब संस्कृती, किनाऱ्यावर बिकीनीचा वापर, मसाज पार्लर वगैरे नकोच अशी भूमिका मांडली होती. हे सर्व काही भारतीय संस्कृतीला धरुन नाही व या गोष्टींवर बंदी यायला हवी, असे त्यांनी म्हटले होते. मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर यांनीही गोव्यात नाईट क्लब बंदच करायला हवे, असे स्पष्ट मत मांडले होते.
राज्यातील युवकांना व्यसनापासून मुक्त करण्यासाठी राज्यात रात्री १२:०० वाजल्यानंतर नाइट लाइफ नकोच आहे. आम्हाला राज्यात आध्यात्मिक पर्यटनाचे केंद्र बनविण्यासाठी आध्यात्मिक पर्यटन वाढविली पाहिजेत,' असे मत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले. नाइट लाइफ आता अती झाले, अशी टिप्पणीही केली.
दरम्यान, काल खोला-काणकोण येथील 'द केप गोवा' रेस्टॉरंटमध्ये संयुक्त समितीने सील केले. या रेस्टॉरंटमध्ये सीआरडीचेही येथे उल्लंघन झालेले आहे. भोगवटा प्रमाणपत्र, व्यापार परवाना, नगर नियोजन खात्याची मंजुरी आणि इतर अनिवार्य परवाने सादर करण्यात मालक अयशस्वी ठरला. मालकाने आवश्यक ते दस्तऐवज घेऊन १५ दिवसांच्या आत दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
तरुणाई धोक्यात...
सोमवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री राणे म्हणाले, 'रात्री १२:०० नंतर नाइट लाइफमुळे अनेक युवक वाईट मार्गाला लागतात. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन करून असे जे नाइट क्लब मध्यरात्री चालतात, ते बंद करायला पाहिजेत. त्यामुळे अपघातही कमी होतील. अनेक पालकांना माझे हे म्हणणे पटणार आहे. तसेच हे माझे वैयक्तिक मत आहे. मी मुख्यमंत्र्यांसमोर हा विषय मांडणार आहे. आम्ही जास्तीत जास्त आध्यात्मिक पर्यटनावर भर दिला पाहिजे.'
मंत्री राणे म्हणाले, 'गोवा हे अध्यात्मिक केंद्राचे हब बनले पाहिजे. अध्यात्मिक पर्यटन म्हणजे कुठल्या एका धर्माचे नाही तर सर्व धर्माचा यात सहभाग आहे. कुठल्याही धर्माचे असले तरी अध्यात्मिक पर्यटनामुळे गोव्याला नवी दिशा मिळणार आहे. आम्ही युवकांना आता आध्यात्मिक पर्यटनाकडे वळवून त्यांना नवी दिशा दिली पाहिजे.'