२०२७ मध्येही भाजप-मगो युती: दीपक ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 13:30 IST2025-12-13T13:29:22+5:302025-12-13T13:30:51+5:30
दोन्ही पक्षांची विचारसरणी समान; जि. पं. निवडणुकीतही यश मिळेल

२०२७ मध्येही भाजप-मगो युती: दीपक ढवळीकर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'भाजप-मगो युती २०२७च्या विधानसभा निवडणुकीतही कायम राहील,' असे मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्या उपस्थितीत सांगितले. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ढवळीकर म्हणाले की,' दोन्ही पक्षांची विचारसरणी समान आहे आणि उत्तर आणि दक्षिण गोव्यात येणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत आमच्या युतीलाच विजय मिळेल.'
फोंड्यात डॉ. केतन भाटीकर यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता ढवळीकर म्हणाले की, 'भाटीकर यांनी दिवंगत रवी नाईक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लढवण्याचा आपला हेतू व्यक्त केला होता. तथापि, पक्षाने त्यांना स्पष्टपणे कळवले की मगोप पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून रवी यांच्या मुलाला पाठिंबा देईल. भाटीकर यांचा पक्ष सोडण्याचा निर्णय वैयक्तिक आहे आणि त्यांचा राजीनामा केंद्रीय समितीच्या बैठकीत स्वीकारला जाईल.'
जिल्हा पंचायत निवडणुकीविषयी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'भाजपने ४० व मगोपने तीन मिळून युतीचे ४३ उमेदवार आम्ही दिले आहेत. सात जागांवर अपक्षांना पाठिंबा जाहीर केला आहे. ८० टक्के नवे चेहरे भाजपने दिले व आमचे ९९ टक्के जुने झेडपी नव्या चेहऱ्यांसाठी सक्रियपणे काम करत आहेत.'
राज्यातील १३ वर्षांच्या भाजप राजवटीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना दामू नाईक म्हणाले की, 'दिल्लीच्या लोकांनी आपल्याला घरी का पाठवले याचे उत्तर केजरीवाल यांनी आधी द्यावे.'
बंडखोरांना विचारू : दामू
दरम्यान, जिल्हा पंचायत निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर तसेच भाजपचे इतर काही नेते पक्षवरोधी काम करत आहेत. काहीजणांनी छुपे बंडही केले आहे त्याबद्दल विचारले असता दामू नाईक म्हणाले की, 'अशा प्रकरणात संबंधितांना जाब विचारून स्पष्टीकरण घेतले जाईल.'
सरदेसाई तक्रार करण्याचे धाडस का दाखवत नाहीत?
भाजपच्या नेत्यांचे नातेवाईक नाईट क्लब चालवत असल्याचा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला आहे. त्याबद्दल विचारले असता दामू नाईक म्हणाले की, 'कोणी काही बेकायदेशीरपणा करत असेल तर सरदेसाई यांनी दक्षता खात्याकडे किंवा इतर यंत्रणांकडे तक्रार करावी. तक्रार करण्याचे धाडस ते का दाखवत नाहीत ? त्यांनी लोकांना मूर्ख बनवू नये.'