Goa Election 2022: भाजप नेत्याचा ऐनवेळी लढण्यास नकार; उमेदवारीसाठी पक्षाची धावाधाव, मतदारांत उत्सुकता शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 09:53 AM2022-01-18T09:53:10+5:302022-01-18T09:53:54+5:30

Goa Election 2022: भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोचलेली आहे.

bjp leader refuses to fight goa election 2022 now party searching new candidate curiosity among voters | Goa Election 2022: भाजप नेत्याचा ऐनवेळी लढण्यास नकार; उमेदवारीसाठी पक्षाची धावाधाव, मतदारांत उत्सुकता शिगेला

Goa Election 2022: भाजप नेत्याचा ऐनवेळी लढण्यास नकार; उमेदवारीसाठी पक्षाची धावाधाव, मतदारांत उत्सुकता शिगेला

Next

विशांत वझे, लोकमत न्यूज नेटवर्क

डिचोली : डिचोली मतदारसंघात राजकीय सत्तानाट्य रंगतदार अवस्थेत पोहोचले असून भाजप उमेदवरीसाठी उच्च पातळीवर मगोचे नरेश सावळ तसेच अपक्ष डॉ. शेट्ये यांना विचारणा झाल्याने तसेच खुद्द सभापती राजेश पाटणेकर यांनी ऐनवेळी  लढण्यास नकार दर्शवल्याने भाजपचा उमेदवार कोण? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

महिला नेत्या शिल्पा नाईक यांना उमेदवारी आपल्यालाच मिळणार, अशी खात्री पटली होती. आताही त्यांचेच नाव पुढे येत आहे. मात्र काल राजकीय पातळीवर जी खलबते झाली, त्यामुळे निश्चितपणे शिल्पा नाईक सावध भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. सर्व बाजू पडताळून पाहून त्या निर्णय घेण्याची शक्यता आहे.  

दुसरीकडे भाजपाला सक्षम असा पर्यायी उमेदवार कोण? याबाबतही चाचपणी सुरू आहे. सध्या शिल्पा नाईक यांचे नाव निश्चित असल्याचे सूत्रांनी सांगितले तर नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या नावाचीही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षनेते शेवटच्या क्षणी कोणती भूमिका घेणार ते पाहावे लागेल. गेल्या काही दिवसांपासून भाजपने सक्षम उमेदवाराचा शोध सुरू केलेला आहे. मात्र, अद्याप त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.

दरम्यान मगोचे नरेश सावळ यांनी यापूर्वीच प्रचार सुरू केल्याने त्यांना भाजपने दिलेली ऑफर त्यांनी नाकारली. शेवटच्या क्षणी एखाद्याचा विश्वासघात करणे हे माझ्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळे मी जिथे आहे, तिथे बरा आहे, हीच माझी भूमिका असल्याचे स्पष्ट करीत त्यांनी भजपला नकार दिला. आपल्या आधीच्या भूमिकेनुसार त्यांनी प्रचार गतिमान केला आहे. 

दुसरीकडे डॉ. शेट्ये यांनाही भाजपने ऑफर दिली. मात्र त्यांनीही मी अपक्षच लढणार, अशी भूमिका कार्यकर्त्यांकडे मांडली आहे. त्यामुळे आता त्यात बदल करण्याबाबत विचार नाही, अशी भूमिका घेतलेली आहे. काल रात्री उशिरापर्यंत त्यांची चर्चा झाली व अखेर अपक्षच लढण्याच्या भूमिकेशी ते ठाम राहिले. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून प्रचाराला गती दिली आहे. सोमवारी ‘लोकमत’च्या वृत्तामुळे बरीच खळबळ उडाली. राजकीय पटलावर होत असलेल्या अंतर्गत घडामोडींबाबत अचूक वृत्त प्रसिद्ध झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजप आता कोणाला उमेदवारी देणार याची उत्सुकता आहे.

पक्षनेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष

आता डिचोली मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कुणाला मिळणार? याबाबत उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. राजेश पाटणेकर यांनी आपली भूमिका का बदलली? त्याची कारणे कोणती? याबाबत उलट-सुलट चर्चा आहे. यासंदर्भात सभापती आपली भूमिका काही दिवसांत स्पष्ट करतील अशी माहिती देण्यात आली. मात्र डिचोली मतदारसंघ या घडामोडींमुळे बराच चर्चेत आलेला असून पक्षनेते व मुख्यमंत्री कोणती भूमिका घेणार त्याकडे सर्वांचे लक्ष आहे.
 

Web Title: bjp leader refuses to fight goa election 2022 now party searching new candidate curiosity among voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.