'भाजप'चा सत्ताप्रवास...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 12:57 IST2025-04-06T12:57:55+5:302025-04-06T12:57:55+5:30

गोवा हे सांस्कृतिक वैविध्याने नटलेलं, ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न आणि राजकीयदृष्ट्या नेहमीच गुंतागुंतीचे राज्य. "जनता पक्ष" या एकत्रित राजकीय प्रयोगातून उगम पावलेला "भारतीय जनता पक्ष" (भाजप) मात्र गोव्यात अत्यंत रोचक आणि अभ्यासनीय प्रवासातून स्थिरावला.

bjp journey to power in goa state | 'भाजप'चा सत्ताप्रवास...!

'भाजप'चा सत्ताप्रवास...!

संदेश साधले

गोव्यात एकेकाळी भाजपला कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी उमेदवार मिळत नव्हते. काही जण 'भाजीपाव' पार्टी म्हणून हिणवत असत. आज जो, तो भाजपमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर ऊर्फ दामू नाईक यांनी साखळी येथील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना हे उद्‌गार काढले.

राजेंद्र आर्लेकर, श्रीपाद नाईक, लक्ष्मीकांत पार्सेकर, मनोहर पर्रीकर मिळेल त्या वाहनाने राज्यभरात फिरत. मिळेल ते खाऊन त्यांना मुक्काम ठोकावा लागत असे. अशा परिस्थितीत त्यांनी भाजप वाढवला, फुलवला असे दामू यांनी नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना सांगितले. हेच सत्य आहे.

गोवा हे सांस्कृतिक वैविध्याने नटलेलं, ऐतिहासिकदृष्ट्या संपन्न आणि राजकीयदृष्ट्या नेहमीच गुंतागुंतीचे राज्य. १९६१ मध्ये भारतात विलीन झाल्यावर गोव्यात राजकीय प्रयोगांची सुरुवात झाली. भारतीय राजकारणाच्या प्रवाहात अनेक पक्षांनी येथे आपली उपस्थिती नोंदवली. पण "जनता पक्ष" या एकत्रित राजकीय प्रयोगातून उगम पावलेला "भारतीय जनता पक्ष" (भाजप) मात्र गोव्यात अत्यंत रोचक आणि अभ्यासनीय प्रवासातून स्थिरावला.

गोव्यात भाजपला हिंदुत्ववादी छाया असलेला, मर्यादित विचारसरणीचा आणि मुख्यतः शहरी उच्चवर्गातील लोकांचा पक्ष म्हणून पहिले गेले. याचे मुख्य कारण म्हणजे गोव्याची मिश्र धार्मिक लोकसंख्या- सुमारे २५-३०% खिस्ती, उर्वरित हिंदू व मुस्लिम. त्यामुळे भाजपचे "हिंदुत्व" हे एक अडथळा ठरत होते. या काळात भाजपला फारशा जागाही मिळत नव्हत्या. १९८० मध्ये भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी, नानाजी देशमुख यांसारख्या नेत्यांनी याला आकार दिला. पण गोव्यामध्ये भाजपचा अजिबात प्रभाव नव्हता.

१९८० च्या दशकात भाजप गोव्यात प्रभावहीन होता. हे दशक काँग्रेस आणि मगो यांच्यातील सत्तासंघर्षाने व्यापलेले होते. भाजपकडे ना प्रभावी नेतृत्व होते, ना खास मतदारसंघ. त्यात गोव्याचे मिश्र धार्मिक व सांस्कृतिक स्वरूप पाहता भाजपची "हिंदुत्ववादी" प्रतिमा रोख ठरत होती. त्या काळात भाजपकडे फारशा जागा नव्हत्या; अनेकदा त्यांच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होत असे.

या काळात भाजपने संघटनात्मक पातळीवर मुळे रुजवण्याचा प्रयत्न सुरू केला. गोमंतकात शाखा, बूथ कार्यकर्ते, सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्याने या माध्यमातून पक्षाने उपस्थिती दर्शवण्यास सुरुवात केली. संघ परिवाराचे कार्यकर्ते आणि विद्वान नेते गोव्यातील विशिष्ट गावांमध्ये कार्यरत राहिले.

१९९४ च्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपने पहिल्यांदा ४ जागा मिळवल्या. हे विजय आकड्याच्या दृष्टीने कमी असले, तरी वैचारिक परिवर्तनाच्या दृष्टीने फार महत्त्वाचे ठरले. याच निवडणुकीत मनोहर पर्रीकर हे प्रथमच निवडून आले. पर्रीकर एक आयआयटी इंजिनीअर, स्वच्छ प्रतिमेचे, अभ्यासू आणि स्थानिक प्रश्नांशी जोडलेले नेतृत्व म्हणून उदयाला आले. त्यांनी गोव्यात भाजपचा चेहरामोहरा बदलायला सुरुवात केली. त्यांनी "हिंदुत्व" च्या पलिकडे जाऊन "शासन व्यवस्थेतील पारदर्शकता, स्थानिक प्रश्नांवर लक्ष, भ्रष्टाचारविरोधी भूमिका" यावर भर दिला. या काळात त्यांनी सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, शालेय शिक्षण या विषयांवर सभागृहात मुद्देसूद भाषणं केली. त्यामुळे भाजपची प्रतिमा हळूहळू बदलू लागली. त्यांच्या भाषणांमधील आक्रस्ताळेपणा नसलेली नम्र पण ठाम मांडणी ही गोव्याच्या प्रगल्भ जनतेला पटली. सरकार आले आणि गेलेही पण भाजपने समाजात विचार पेरणी सुरुच ठेवली.

पुढे २०१२ मध्ये भाजपने २१ जागा जिंकल्या स्पष्ट बहुमत मिळवले. यामागे काँग्रेस सरकारातील प्रचंड भ्रष्टाचार, खाण घोटाळा आणि जनतेचा असंतोष कारणीभूत होता. यावेळी पर्रीकरांनी "सामाजिक सलोखा, प्रादेशिक अस्मिता आणि पारदर्शकता" या त्रिसूत्रीवर भर दिला. ख्रिस्ती समाजाचाही काही प्रमाणात भाजपकडे ओढा झाला. पर्रीकरांचे विधान "गोवा हा गोमंतकीयांचा आहे, धर्माच्या आधारावर विभागणी आम्ही मानत नाही" हे प्रभावी ठरले. पर्रीकरांनी हिंदुत्वाच्या पलीकडे जाऊन "गोमंतकीय अस्मिता" यावर भर दिला. त्यांनी वारंवार म्हटले, "गोवा सर्व धर्मीयांचा आहे. आम्ही राजकारणाला धर्माच्या चौकटीत पाहत नाही."

पुढे सत्ता स्थापनेसाठी २०१७ मध्ये खेळी करण्यात आली २०२२ मध्ये अपक्ष आणि मगोचा पाठिंबा घेतला, गोव्यातील राजकारण हे केवळ जनादेशावर नाही, तर "संघटनशक्ती, लवचिकता आणि राजकीय खेळी" यावरही अवलंबून आहे हेच यातून अधोरेखित केले. भारतीय जनता पक्ष ही आता राजकीय व्यवहारक्षमतेची आणि सत्तास्थैर्याची ओळख बनली आहे. ही परिवर्तनाची गोष्ट मनोहर पर्रीकरांपासून सुरू होते आणि डॉ. प्रमोद सावंतांपर्यंत पोहोचते. प्रमोद सावंत हे आयुर्वेदीक डॉक्टर आणि पर्रीकरांचे विश्वासू कार्यकर्ते. त्यांनी कारभार हळूहळू सावरला. त्यांच्या कार्यकाळात कोरोनाच्या संकटाला सामोरे जात सरकारने आरोग्य यंत्रणा स्थिर ठेवली. ई गव्हर्सनन्स, डिजिटल सेवा केंद्रे, पर्यटन क्षेत्रात सुधारणा हे त्यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचे टप्पे ठरले आहेत.

भाजपने स्थानिकतेशी जुळवून घेतले, मतविभागणी न करता समाजमन जिंकण्याचा प्रयत्न केला, प्रशासनात पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या यशात काँग्रेसच्या गोंधळलेल्या नेतृत्वाचाही वाटा आहे. आज भाजप गोव्यात "एकमेव स्थिर सत्ता पर्याय" म्हणून ओळखला जातो. पण हे यश केवळ संघटनात्मक ताकदीमुळे नाही, तर लोकांशी प्रामाणिक संबंध, सुस्पष्ट नेतृत्व व दीर्घकालीन नियोजनामुळे आहे.

 

Web Title: bjp journey to power in goa state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.