'लोकमत'च्या रिपोर्ट कार्डची भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी घेतली दखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 07:35 IST2025-03-24T07:34:59+5:302025-03-24T07:35:56+5:30
'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष योग्य त्या ठिकाणी हे रिपोर्ट कार्ड पाठविणार आहेत.

'लोकमत'च्या रिपोर्ट कार्डची भाजपा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी घेतली दखल
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल 'लोकमत मंत्र्यांच्या टीम'ने लोकांशी बोलून तयार केलेल्या रिपोर्ट कार्डची भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही दखल घेतली आहे. 'लोकमत'ला मिळालेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष योग्य त्या ठिकाणी हे रिपोर्ट कार्ड पाठविणार आहेत.
मुख्यमंत्री म्हणून प्रमोद सावंत यांनी सहा वर्षे पूर्ण केली. फेब्रुवारी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा सरकार स्थापन केल्यास तीन वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर 'लोकमत'ने बातमीदारांची टीम वापरून सर्व मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेतला. मंत्र्यांनी कोणती सकारात्मक कामे केली व कोणती कामे करण्यात अपयश आले, याचा लेखाजोखा मांडला. लोकांनी व्यक्त केलेल्या मतांच्या आधारावरच गुण दिले होते. मुख्यमंत्र्यांसह दामूंनीही 'लोकमत'चे रिपोर्ट कार्ड वाचले.
माहितीत आणखी भर पडली : प्रदेशाध्यक्ष
'लोकमत'शी बोलताना प्रदेशाध्यक्ष दामू नाईक म्हणाले की, 'मी स्वतः यापूर्वी मंत्र्यांच्या कामांचा ढोबळ मानाने अभ्यास केला होता. शिवाय पक्षाची तटस्थ यंत्रणाही मंत्र्यांच्या कामाचा वेळोवेळी अशाप्रकारे आढावा घेत असते. केंद्रीय नेत्यांना त्यांच्या यंत्रणेमार्फत अहवाल पोहोचत असतो. मी ढोबळ मानाने मंत्र्यांच्या कामगिरीबद्दल माहिती घेतली होती. 'लोकमत'ने तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमुळे या माहितीत आणखी भर पडली. मी मिळवलेली माहिती आणि लोकमतचे रिपोर्ट कार्ड यात काय साम्य आहे व चांगले काय घेता येईल याचा विचार निश्चितच करू.'