भाजपचे डबल इंजिन सुसाट; फोंड्यात ८ जागांवर विजय, 'रायझिंग'चे पानिपत तर काँग्रेसचा सुफडा साफ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2023 03:12 PM2023-05-08T15:12:00+5:302023-05-08T15:13:46+5:30

फोंडा नगरपालिकेच्या १३ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळवला.

bjp double engine roars ponda municipal election wins 8 seats | भाजपचे डबल इंजिन सुसाट; फोंड्यात ८ जागांवर विजय, 'रायझिंग'चे पानिपत तर काँग्रेसचा सुफडा साफ

भाजपचे डबल इंजिन सुसाट; फोंड्यात ८ जागांवर विजय, 'रायझिंग'चे पानिपत तर काँग्रेसचा सुफडा साफ

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा: फोंडा नगरपालिकेच्या १३ प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने आठ जागांवर विजय मिळवला. रायझिंग फोडाचे चार तर एक अपक्ष नगरसेवक निवडून आला. काँग्रेसच्या पाचपैकी एकाही उमेदवाराला विजयी होता आले नाही. कृषी मंत्री रवी नाईक यांचे पुत्र व विद्यमान नगराध्यक्ष रितेश नाईक, रॉय नाईक, वीरेंद्र ढवळीकर, ज्योती नाईक, शौनक बोरकर, रूपक देसाई, दीपा कोलवेकर, आनंद नाईक यांनी भाजपतर्फे विजय संपादन केला. तर रायझिंग फोडाच्या वेदिका वळवईकर, प्रतीक्षा नाईक, शिवानंद सावंत व गीताली तळावलीकर यांनी विजय मिळवला. व्यंकटेश नाईक हे एकमेव अपक्ष निवडून आले आहेत.

रवींचे दोन्ही पुत्र विजयी

यंदाच्या निवडणुकीत संपूर्ण राज्याचे लक्ष मंत्री रवी नाईक यांच्या पुत्रांच्या लढतीकडे लागले होते. रॉय नाईक यांनी प्रभाग एकमधून रायझिंग फोंडाचा पराभव करून राजकारणात दमदार एन्ट्री केली. तर प्रभाग पाचमधून रितेश नाईक यांनी एकतर्फी विजय मिळवत दुसऱ्यांदा नगरसेवक बनण्याचा मान मिळवला आहे.

मोजक्या मतांनी पराभव

डॉ. केतन भाटीकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवलेल्या रायझिंग फोंडाचे दोन उमेदवार यावेळी कमनशिबी ठरले. प्रभाग तीनमधील शेरील डिसोझा या फक्त तीन मतांनी पराभूत झाल्या तर प्रभाग १० मधील मनस्वी मामलेदार या केवळ एका मताने पराभूत झाल्या.

मिळाली सर्वाधिक मते

भाजपचे प्रभाग १४मधील उमेदवार आनंद नाईक यांनी सर्वाधिक ६१२ मते मिळाली. त्यांनीच सर्वाधिक ४१५ इतके मताधिक्यसुद्धा मिळवले.

विद्यमान नगरसेविकाला ११ मते

विद्यमान नगरसेविका चंद्रकला नाईक यांनी प्रभाग चारमधून निवडणूक लढवली. मतदारांनी त्यांना नाकारले. त्यांना केवळ १९ मते मिळाली. ही अल्प मते पालिका क्षेत्रात चर्चेचा विषय बनला.

चिठ्ठीवर मिळवला विजय

प्रभाग १५ मध्ये माजी नगराध्यक्ष गीताली तळावलीकर व माजी नगराध्यक्ष किशोर नाईक यांची कन्या संपदा यांच्यात चुरशीची अशी लढत झाली. मतमोजणीतही विजयासाठीची रस्सीखेच दिसून आली. दोघांनाही समान ४०२ मते मिळाली. अखेर चिठ्ठी टाकून उमेदवार विजयी घोषित करण्याचे ठरले. गिताली या सुदैवी ठरल्या. या विजयासह त्यांनी हॅटट्रिक साधली.

हे पहिल्यांदाच नगरसेवक

यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी सात नव्या चेहन्यांना संधी दिली आहे. यात रॉय नाईक, ज्योती नाईक, शौनक बोरकर, प्रतीक्षा नाईक, रुपक देसाई, वेदिका वळवईकर, दीपा कोलवेकर यांचा समावेश आहे.

मातब्बरांना पराभवाचा फटका

पालिका राजकारणातील वेगळी ओळख असलेल्या काही मातब्बर उमेदवारांना मतदारांनी नाकारल्याचे दिसले. यात मगोचे गटाध्यक्ष मंगेश कुंडईकर, तीनदा निवडून आलेले विन्सेट फर्नाडिस, मगोच्या केंद्रीय समितीचे सदस्य अनिल नाईक यांचा समावेश आहे.

यांनी राखला गड

व्यंकटेश नाईक, रितेश नाईक, शिवानंद सावंत, आनंद नाईक व गीताली तळावलीकर, विरेंद्र ढवळीकर यांनी आपापले गड राखल्याचे मतमोजणीनंतर दिसून आले. माजी नगराध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी पत्नीला निवडून आणले आहे. तर माजी नगराध्यक्ष प्रदीप नाईक यांनी कन्येला निवडून आणले.

सलग चौथ्यांदा सभागृहात

पालिका वर्तुळातील दादा असलेले व्यंकटेश नाईक यांनी सलग चौथ्यांदा विजय प्राप्त करून अनोखा विक्रम केला. तर शिवानंद सावंत हेही अप्रत्यक्षपणे चौथ्यांदा विजयी झाले. ते स्वतः तीनदा निवडून आले तर मागच्या कार्यकाळात त्यांच्या पत्नी जया या विजयी झाल्या होत्या.

काँग्रेसचा सुपड़ा साफ

निवडणुकीत राजेश बेरेकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पाच उमेदवार रिंगणात होते. या सर्वांना पराभवाचा धक्का बसला. काँग्रेस गटाध्यक्ष विल्यम आगिवार यांच्या पत्नीलासुद्धा दारुण पराभव स्वीकारावा लागला. काँग्रसचे दोन उमेदवार मतांमध्ये दुसया स्थानावर आले असले तरी ते मूळ काँग्रेसचे नसून दुसऱ्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसवर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

 

Web Title: bjp double engine roars ponda municipal election wins 8 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.