भाजपचाच दबदबा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची किमया, झेडपी निवडणुकीत मोठे यश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 08:57 IST2025-12-23T08:56:18+5:302025-12-23T08:57:46+5:30
काँग्रेसला दक्षिणेत दिलासा, आरजीने दाखवली शक्ती : अपक्षांनी दिले धक्के

भाजपचाच दबदबा; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाची किमया, झेडपी निवडणुकीत मोठे यश
पणजी : २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपने निर्विवाद वर्चस्व मिळवत २९ जागांवर बाजी मारली. तर मित्रपक्ष मगोपला ३ जागा मिळाल्या. या निवडणुकीत भाजपला रोखण्याचा चंग बांधून मैदानात उतरलेल्या विरोधकांना मात्र फारसे यश मिळवता आले नाही. काँग्रेसला १० जागा मिळवता आल्या. तर आरजी २, गोवा फॉरवर्ड १, आम आदमी पक्षाला एका जागेवर समाधान मानावे लागले. तर अपक्षांनी ४ जागा काबिज करत अनेकांना धक्के दिले.
रिवण जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपच्या उमेदवार राजेश्री गावकर यांचा केवळ १९ मतांनी विजय झाला आहे. राजेश्री यांना ६३२९ मते मिळाली, तर गोवा फॉरवर्ड व काँग्रेस युतीच्या उमेदवार साईज्ञा गावकर यांना ६३१० मते मिळाली. आम आदमी पक्षाच्या उमेदवार तेजस्विनी गावकर यांना केवळ ४६८ मते मिळाली.
२० महिला बनल्या झेडपी सदस्य
जिल्हा पंचायत निवडणुकीत महिला उमेदवारांनी मोठी बाजी मारली. दोन्ही जिल्ह्यांत मिळून २० महिलांनी विजय संपादन केला आहे. यामध्ये उत्तर गोव्यात नऊ महिला तर दक्षिण गोव्यातील ৭৭महिला उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली. विजयी उमेदवारांमध्ये भाजपच्या महिलांची संख्या सर्वाधिक असून, त्यापाठोपाठ काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड आणि अपक्ष महिला उमेदवारांचा समावेश आहे.
विश्वजीत, दिव्या यांचा प्रभाव वाढला
सत्तरी तालुक्यातील होंडा, नगरगाव व केरी तिन्ही झेडपी मतदारसंघांमध्ये भाजपच्या उमेदवारांना प्रत्येकी दहा हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली. यामुळे मंत्री विश्वजीत राणे व पर्येच्या आमदार दिव्या राणे यांचा प्रभाव कायम असल्याचे दाखवून दिले. होंडा येथील उमेदवार नामदेव चारी यांना ११, ७५१, केरीचे नीलेश परवार यांना १३, २६४ तर नगरगाव मतदारसंघाचे उमेदवार प्रेमनाथ दळवी यांना ११,३६९ मते मिळाली.
'सेमीफायनल'ला लागली 'कसोटी'
जिल्हा पंचायत निवडणूक ही २०२७ च्या विधानसभा निवडणुकीची ही 'सेमीफायनल' मानली गेली. त्यामुळे भाजपने सुरुवातीपासून जोर लावला होता. सर्व मंत्री-आमदार आपापल्या मतदारसंघातील झेडपी सदस्य निवडून आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून आले.
२०२० मध्ये झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपला मोठी कसरत करावी लागली. दक्षिण गोव्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे. विशेष म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत विरोधक एकत्र आले, तर भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, असे मत काही जाणकार व्यक्त करत आहेत.
मंत्री, आमदारांना धक्के
जिल्हा पंचायत निवडणुकीत सर्वांत जास्त फटका पशूसंवर्धनमंत्री नीळकंठ हळर्णकर यांना बसला आहे. कोलवाळ व शिरसई या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे उमेदवार निवडून येऊ शकले नाहीत.
खोला मतदारसंघात भाजप उमेदवार तेजल पागी यांचा पराभव झाला. हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला आहे. श्रीस्थळमध्ये भाजपला जास्त मते मिळाली नाही. मंत्री रमेश तवडकर यांच्यासह बाबू कवळेकर यांच्यासाठीही धोक्याची घंटा मानली जात आहे. रिवणमध्ये मंत्री सुभाष फळदेसाई यांचा उमेदवार फक्त १९ मतांनी निवडून आला.
सांताक्रूझमध्ये आमदार रुदोल्फ फर्नाडिस भाजप उमेदवाराला निवडून आणू शकले नाहीत. येथे अनपेक्षितपणे आरजीच्या उमेदवार एस्पेरेन्सा ब्रागांझा विजयी झालेल्या आहेत.
बेतकी-खांडोळा मतदारसंघात आमदार गोविंद गावडे हेही भाजप उमेदवार श्रमेश भोसले यांना निवडून आणू शकले नाहीत. येथे अपक्ष उमेदवार सुनील जल्मी-भोमकर निवडून आले. प्रियोळ मतदारसंघात गोविंद यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती.
नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर हे भाजप उमेदवार लक्ष्मी शेटकर यांना निवडून आणू शकले नाहीत. दवर्लीतही भाजप उमेदवाराचा पराभव झाला. कुडतरीत अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी भाजप सरकारला दिलेला पाठिंबा मतदारांना मानवलेला नाही. या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार निवडून आला आहे.
हरमलमध्ये भाजप-मगो युतीचा झालेला पराभव भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे यांच्यासाठी इशारा देणारा ठरला आहे. या मतदारसंघात अपक्ष उमेदवार राधिका पालयेंकर निवडून आलेल्या आहेत.
पंतप्रधानांकडून कौतुक
जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजप मगो युतीला भक्कम पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील जनतेचे आभार मानले आहेत. जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदारांनी दिलेला हा जनादेश सुशासन आणि प्रगतीशीला राजकारणावरील विश्वासाचे प्रतिबिंब आहे. या निकालामुळे गोव्याच्या विकासाच्या प्रयत्नांना बळकटी मिळेल, असे त्यांनी नमूद करून भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमांचे कौतुक केले.
झेडपी निवडणूक बॅलेट पेपरवर झाली असतानाही भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यामुळे ईव्हीएमवर आरोप करणाऱ्या विरोधकांना जनतेनेच चपराक दिली आहे. भाजपने यंदा केवळ ४० जागा लढवल्या असून त्यापैकी ८० टक्क्यांहून अधिक जागांवर विजय मिळवला. - डॉ. प्रमोद सावंत, भाजप