भाजप-मगो युती पंतप्रधानांचे विचार पुढे नेईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 11:58 IST2025-03-16T11:56:58+5:302025-03-16T11:58:20+5:30
मडकई येथे आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप-मगो युती पंतप्रधानांचे विचार पुढे नेईल; आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, मडकई : भाजप व मगो या दोन पक्षांची युती कायम राहील. ही युती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार पुढे नेईल. मोदी यांचे विचार गोव्यात घरोघरी पोहचविण्याचे काम भाजप-मगो एकत्रपणे करील, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केले.
आरोग्य खात्यातर्फे मडकई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी मोफत आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी वीज मंत्री सुदिन ढवळीकर, गोवा आरोग्य संचालनालयाच्या संचालिका डॉ. रूपा नाईक, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, गोवा डेंटल कॉलेजच्या डीन डॉ. आयडा डी नोरोन्हा डी आताईद, तसेच आरोग्य अधिकारी डॉ. उत्कर्ष उपस्थित होते. मंत्री ढवळीकर हे लोकांमध्ये जाऊन काम करतात. मडकईवासीयांचे नशीब आहे की ढवळीकरांसारखा नेता त्यांचे नेतृत्व करत आहे. गोव्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे. ढवळीकर मला मोठ्या भावासारखे आहेत. भाजप व मगो पक्ष मिळून घरोघर आरोग्य सेवा पोहचवेल, असे मंत्री राणे यांनी यावेळी सांगितले.
फ्रेजेल आरावजो सल्लागारपदी
आरोग्य खात्याच्या आणि महिला व बाल कल्याण खात्याच्या प्रमुख म्हणून फ्रेजेल आरावजो या काम पाहतील. त्यांची नियुक्ती आरोग्य मंत्र्यांच्या सल्लागार म्हणून करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालय व आरोग्य मंत्री यांच्यासाठी त्या सल्लागार आहेत. त्यांच्याकडून महिला व बाल कल्याण आणि आरोग्य या दोन्ही खात्यांचे धोरण निश्चित केले जाईल. धोरणानुसार अंमलबजावणी होते की नाही हे त्या पाहतील. त्यांना डॉ. गीता देशमुख या कामात साहाय्य करतील, असे मंत्री राणे यांनी जाहीर केले.
विश्वजीत राणे यांनी आरोग्य क्षेत्रात केले मोठे बदल : सुदिन ढवळीकर
मंत्री ढवळीकर म्हणाले, जेव्हापासून मंत्री विश्वजीत राणे यांनी आरोग्य खात्याचा ताबा स्वीकारला तेव्हापासून राज्यातील आरोग्य सुविधेत मोठी सुधारणा दिसून आली आहे. गोमेकॉमध्ये वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. आज प्राथमिक आरोग्य केंद्रामध्येही अनेक आजारांवर उपचार उपलब्ध होऊ लागले आहेत.
फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयातही चांगल्या सुविधा व प्रामाणिक डॉक्टर देखील उपलब्ध झाले आहेत. सरकार कर्करोग निदान करण्यासाठी तपासणी शिबिर राबवत आहे. त्यात काही महिलांना कर्करोग झाल्याचे निदानही झाले. अशांना मदत करण्यासाठी आपले नेहमीच सहकार्य असेल, असेही मंत्री ढवळीकर म्हणाले.
सुदिन मोठ्या भावासारखे
मंत्री सुदिन ढवळीकरांमुळे मडकई मतदारसंघाचा मोठा विकास झाला आहे. ढवळीकरांना जेवढा मान गोव्याच्या मंत्रिमंडळात आहे, त्यापेक्षा जास्त मान त्यांना केंद्रात आहे. ढवळीकर हे फक्त माझे राजकीय मित्रच नाहीत तर ते मला मोठ्या भावासारखे आहेत. त्यांच्यासोबतच्या माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी आहेत. मला शाळेत पोचविणारे तेच होते. माझे वडील त्यांना माझ्यात शिस्त यावी म्हणून त्यांना मला सल्ला द्यायला सांगत होते. ते आमच्या कुटुंबाच्या सदस्यासारखे असल्याचे उद्गार मंत्री राणे यांनी काढले.
राज्यातील जनतेला विनामुल्य अशी दर्जेदार आरोग्य सेवा देणे यासाठी आरोग्य खात्यातर्फे राज्यभर मेगा मेडिकल कॅमचे आयोजन केले जाते. नागरिकांनी या शिबिराचा पूर्ण लाभ घ्यावा, असेही आवाहन मंत्री राणे यांनी केले आहे.