भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:01 IST2025-04-11T13:01:21+5:302025-04-11T13:01:52+5:30
ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी

भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी भंडारी समाजाच्या चळवळीची व्याप्ती आता वाढली आहे. समाजाच्या नेत्यांनी काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचीही भेट घेतली. विधानसभेत खासगी ठराव आणण्याचे आश्वासन युरी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.
दुसरीकडे या चळवळीची भाजपनेही गंभीर दखल घेतल्याचे दिसत असून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन भंडारी समाज पक्षापासून दूर जाऊ नये यासाठी चर्चा केली. रवी हे या समाजाचे खंदे नेते मानले जातात. दोघांमधील चर्चेत या प्रश्नावर ठोस धोरण ठरवण्याबाबत चर्चा विनिमय झाला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार किरण कांदोळकर, माजी आमदार श्याम सातार्डेकर, तारक आरोलकर, रोहन नाईक आदींचा समावेश होता.
या भेटीनंतर 'लोकमत'शी बोलताना कांदोळकर म्हणाले की, आम्ही दोघांनाही निवेदन देऊन आमची मागणी मांडलेली आहे. युरी यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात या विषयावर खासगी ठराव आणण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. २०११ साली चुकीची जनगणना झाली होती. २०२१ साली कोविडमुळे ती होऊ शकली नाही. आता नव्याने होणारी जनगणना जातनिहाय केली जावी. ओबीसींच्या बाबतीत जातनिहाय गणना करावी, अशी आमची मागणी आहे. जनगणनेसाठी बाहेरील एजन्सी आम्हाला नकोय. त्याऐवजी बीएलओची मदत घ्यावी, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते, असेही कांदोळकर म्हणाले.
माजी मंत्री, आमदार यांचीच जास्त धडपड!
भंडारी नेत्यांचे शिष्टमंडळ यापूर्वी आमदार विजय सरदेसाई तसेच मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनाही भेटलेले आहे. या चळवळीत भाजपच्या माजी मंत्री, आमदारांचीच जास्त धडपड दिसून येते. माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक तसेच माजी आमदार किरण कांदोळकर यात सक्रिय आहेत. या चळवळीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही बारकाईने लक्ष आहे. ही चळवळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अस्तित्वात
राहील की नाही, हे पहावे लागेल.