मुख्यमंत्र्यांसोबत भंडारी समाजाची बैठक; एकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा पुढाकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:09 IST2026-02-17T13:08:07+5:302026-02-17T13:09:02+5:30
सध्या भंडारी समाजात समाजबांधवांचे दोन तीन गट आहेत. दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. समाजात एकी व्हावी म्हणून माजी आमदार दामू नाईक यांनी पुढाकार घेतला.

मुख्यमंत्र्यांसोबत भंडारी समाजाची बैठक; एकीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांचा पुढाकार
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्यातील भंडारी समाजातर्फे महत्त्वाचे सर्व नेते काल, सोमवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांना भेटले. समाजात एकी व्हावी म्हणून जुन्या उपनियमांनुसार लवकर समाजाची निवडणूक घेतली जावी, असा विषय बैठकीत चर्चेस आला.
सध्या भंडारी समाजात समाजबांधवांचे दोन तीन गट आहेत. दोन वेगवेगळ्या संघटना आहेत. समाजात एकी व्हावी म्हणून माजी आमदार दामू नाईक यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार काल मुख्यमंत्री सावंत यांच्या सरकारी बंगल्यावर बैठक झाली. दामू नाईक व मुख्यमंत्री सावंत यांनी समाजाच्या नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले.
माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांच्यासह समाजाचे विविध नेते बैठकीत सहभागी झाले. माजी आमदार किरण कांदोळकर मात्र उपस्थित नव्हते. तात्पुरता प्रशासक नेमावा व कायदेशीर पद्धतीने लवकर समाजासाठी निवडणूक व्हावी व जुने उपनियम त्यासाठी विचारात घेऊन प्रक्रिया करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशानुसार सरकार पावले उचलणार असल्याचे सांगितले.
गोव्यात भंडारी समाज हा खूप मोठा आहे. सर्वांनीच एकत्र काम करावे. समाजात फूट नकोच. सरकार तोडगा काढील. कालची बैठक योग्य प्रकारे झाली. - दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष