भाई, सदैव स्मरणात राहाल! गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 13:19 IST2025-03-16T13:17:56+5:302025-03-16T13:19:45+5:30
सोमवारी १७ मार्च रोजी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त....

भाई, सदैव स्मरणात राहाल! गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकरांना पत्र
श्रुती हजारे, फोंडा
आदरणीय भाई...
समस्त गोमंतकीयांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या तुम्हाला आम्हा गोवेकरांचा मानाचा दंडवत! लहानपणीच भावंडांसोबत खेळताना तुम्ही तुमच्यातील चाणाक्षवृत्ती, प्रसंगावधान, आलेल्या परिस्थितीला धीराने तोंड देण्याची तुमची क्षमता दाखवून दिलीत. पुढे आयआयटीमधून इंजिनिअरिंगचं उच्चशिक्षण तुम्ही घेतलंत. संघाची शिकवण, शिस्त यामुळे तुमचं संपूर्ण जीवनच शिस्तबद्ध. गोव्याच्या राजकारणातला तुमचा प्रवेश हे आम्हा गोमंतकीयांचे भाग्य. ३९ व्या वर्षी आमदार, ४५ व्या वर्षी मुख्यमंत्री आणि वयाच्या साठीपूर्वीच केंद्रीय संरक्षणमंत्रिपद हा तुमच्या राजकीय कारकिर्दीचा उल्लेखनीय आलेख! २००० साली तुम्ही गोव्याचे मुख्यमंत्री बनलात. सन २००० ते २००५ हा गोव्यासाठी राजकीयदृष्ट्या परिवर्तनाचा काळ होता. मंदिराजवळच्या तळ्यातलं पाणी ढवळून निघावं तसा हा काळ...
अधिकारांचा सुयोग्य वापर करून कामं तडीस लावण्याच्या तुमच्या झपाट्यामुळे "आमचो भाई सॉलिड आसा!" असं आशादायी चित्रं जनमानसात निर्माण झालं होतं. एखाद्या कार्यक्रमात बुश शर्ट, पॅन्ट आणि सैंडल्स अशा साध्या पोशाखातल्या मुख्यमंत्र्यांना बघून अपरिचित लोकांना आश्चर्य वाटायचं.. साध्या कपड्यांमध्ये वावरणारे मुख्यमंत्री हा त्यांच्यासाठी धक्काच असायचा! पण साधेपणा आणि सहज वावर ही तुमची अंतस्थ वृत्ती...!
तुम्ही मुख्यमंत्री झाल्यावर मिळालेल्या 'महालक्ष्मी' बंगल्याचं कार्यालयात रूपांतर केलंत.. सततच्या कामाच्या व्यस्ततेमुळे '२४ तास ऑन ड्युटी मुख्यमंत्री" असं गोंयकार अभिमानाने म्हणायचे. एका छोट्याशा राज्याचा मुख्यमंत्री ते देशपातळीवरच्या पहिल्या पाच मंत्र्यांमध्ये गणना होणं, हा अद्भुत प्रवास अवघ्या दीड दशकांमध्ये तुम्ही पूर्ण केलात!
एक सर्वसामान्य गोंयकार मुख्यमंत्री झाल्यावर गोव्यात आणि गोव्याच्या राजकारणात नवचैतन्य पसरलं होतं. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे भाई तुम्ही फक्त गोव्यातच नव्हे तर गोव्याबाहेरही लोकप्रिय झाला होता...!
गोव्यात इफ्फी येण्याआधी रात्र-रात्र बांधकामाच्या साइटवर उभे राहून बांधकाम पूर्ण करवून घेणारे तुम्ही समस्त इंजिनियर्सच्याच नाही तर गोंयकारांच्याही कायम स्मरणात राहाल. मंत्रिमंडळाच्या अवास्तव खर्चावर बंधन घालणारे चांगल्या अर्थाने गोव्याचे रॉबिनहुड ठरलात. कुठलीही सेवा मोफत देणं या संकल्पनेला तुमचा विरोध असला तरी गरजू स्त्रिया, गरजू बुद्धिमान विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी सरकारी तिजोरीतला पैसा तुम्ही प्राधान्याने खर्च केलात.
२००५ मध्ये विरोधी पक्षनेता असतानाही तुमची कारकिर्द तितकीच तेजस्वी होती. गोव्याच्या जनतेने या विरोधी पक्ष नेत्यावरही तितकंच प्रेम केलं. त्या काळातही तुमच्याकडे गान्हाणी घेऊन येणाऱ्या माणसांची संख्या कमी नव्हती. भाई आपलं काम करणार, हा विश्वास लोकांच्या बोलण्यातून दिसायचा. त्या काळातले तुमचे विधानसभेतले भाषण गाजायचे. सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्यासाठी गृहपाठ कसा असावा, प्रश्न कसे मांडावेत, मंत्र्यांनी दिलेल्या प्रश्नांना प्रतिप्रश्न कसे विचारावेत, यासाठी तुम्ही प्रचंड पूर्वतयारी करायचा. तुम्हाला पाहून नवखे आमदारही प्रेरणा घेत होते. आपल्या भाषणाने वर्तमानपत्रातली बरीचशी जागा व्यापणारे तुम्ही एकमेव नेते ठरलात.
संरक्षण मंत्रिपदावर कार्यरत असताना बालाकोट एअर स्ट्राइक, उरीचा सर्जिकल स्ट्राइक यातून दहशतवाद्यांना चोख उत्तर देऊन भारतीयांच्या मनात एक अभिमानाचं स्थान निर्माण केलंत. राफेलचा शस्त्र करार तुमच्याच कारकिर्दीत अंतिम टप्प्यात पोहोचू शकला. सैनिकांसाठी वन रैंक वन पेन्शन ही निवृत्ती वेतनाची योजना पूर्ण अभ्यासांती तुम्हीच कार्यान्वित केलीत. यासाठी आपल्या भारतमातेचं अहोरात्र रक्षण करणारा प्रत्येक सैनिक तुमच्याविषयी कृतज्ञ राहील. राष्ट्रीय युद्धसंग्रहालय आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं वीस वर्षांपासून रखडलेलं काम तुम्ही पूर्ण केलंत. आज ही दोन्ही स्मारकं तुमच्यामुळे उभी राहिलीत.
कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराविरुद्धही तुम्ही शूर योद्ध्यासारखे लढलात. तुमच्यात असलेली अपरिमित ऊर्जा, काम करण्याची ओढ आणि अंगभूत चैतन्याच्या बळावर तुम्ही या आजाराशी झुंज देत राहिलात. 'अटल सेतू' हे तुमचं अखेरचं स्वप्न...! आज गोव्यात हा पूल दिमाखात उभा आहे. आणि तो गोमंतकीयांच्याच नाही तर सर्व भारतीयांच्या मनाचा तुमच्याशी असलेला अटल दुवा आहे! पराकोटीची निस्पृहता, अफाट बुद्धिमत्ता, लखलखीत कर्तृत्व, समर्पणभाव आणि अखेरच्या क्षणापर्यंत मृत्यूशी धीराने दिलेली झुंज समस्त गोमंतकीयांच्या कायम स्मरणात राहील. भाई तुम्ही आमच्या हृदयात कायम जिवंत आहात.. सदैव स्मरणात राहाल... तुमच्या पवित्र स्मृतींना वंदन...
- तुमचाच, प्रत्येक गोमंतकीय