१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 11:00 IST2025-12-10T10:59:48+5:302025-12-10T11:00:26+5:30
चहाच्या बागेत काम करण्याची मजुरी केवळ २०० रूपये रोज होती. ज्यात राहुलला कुटुंबाचं पालनपोषण करणं शक्य नव्हते

१ महिन्यापूर्वी बनला वडील, पैसे कमवायला गोव्यात आला; नाइट ड्युटीच्या पहिल्याच दिवशी जीव गमावला
म्हापसा - गोव्यातील प्रसिद्ध नाइट क्लबमध्ये ७ डिसेंबरला आग लागल्याने मोठी दुर्घटना घडली. या भीषण आगीत २५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही जागा शहरातील प्रसिद्ध बीचजवळ होती. जिथे बॉलिवूडच्या गाण्यावर लोक थिरकत होती. या दुर्घटनेत ३२ वर्षीय राहुल तांती नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला ज्याची त्या रात्री पहिल्यांदाच नाइट ड्युटी होती.
रिपोर्टनुसार, एक महिन्यापूर्वी राहुल वडील बनला होता. त्याच्या पत्नीने मुलाला जन्म दिला. त्यामुळे आसामवरून तो त्याचे गाव सोडून पैसे कमवण्यासाठी गोव्याला आला. राहुल तांती अरपोरा नाइट क्लबमध्ये स्टाफ म्हणून काम करत होता. राहुलच्या घरात सात भाऊ बहिणी आहेत त्यातील राहुल सर्वात मोठा होता. त्यांचे कुटुंब शेती करत होते. चौथीच्या वर्गातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर राहुलने वडिलांची शेतीत मदत करायचे ठरवले. तिसऱ्या मुलाच्या जन्मानंतर राहुल २४ नोव्हेंबरला गोव्याला गेला होता. राहुलला ९ आणि ६ वर्षाच्या दोन मुली आहेत असं त्याच्या भावाने सांगितले.
चहाच्या बागेत काम करण्याची मजुरी केवळ २०० रूपये रोज होती. ज्यात राहुलला कुटुंबाचं पालनपोषण करणं शक्य नव्हते. मुलांना चांगल्या शाळेत शिकवण्याची त्याची इच्छा होती. २०२१ मध्ये तो आसामच्या बाहेर काम करण्यासाठी गेला होता. त्यानंतर कमाई करून तो परतला आणि त्याने एक घर बांधले. कुटुंबासोबत राहू लागला. बागेत काम करायचा. त्यानंतर अलीकडेच मुलाच्या जन्मानंतर त्याने पैसे कमावण्यासाठी पुन्हा बाहेर नोकरीला जायचे ठरवले. कमी पैशात घर चालणार नाही म्हणून तो गोव्याला नोकरीला गेला होता. ज्या रात्री आगीची दुर्घटना घडली तेव्हा राहुलची पहिलीच नाइट शिफ्ट होती असंही राहुलच्या भावाने सांगितले.
दरम्यान, राहुल गोव्यात ८ वर्षापासून काम करत होता. २०२३ साली तो पुन्हा गावी परतला आणि कुटुंबासोबत राहू लागला. राहुलला रात्रीची नोकरी हवी होती, जेणेकरून दिवसाही तो काम करून काही पैसे कमावणार होता. त्याला त्याच्या मुलांकडे लवकर परतायचे होते. परंतु क्लबला लागलेल्या आगीत त्याचा जीव गेला. या दुर्घटनेत राहुल तांतीसोबतच आसाममधील २३ वर्षीय मनोजीत मल या युवकाचाही मृत्यू झाला. दीड वर्षापूर्वी तो आसाम सोडून चांगल्या पगाराच्या शोधात गोव्यात पोहचला होता.