कचऱ्याबाबत जबाबदारीने वागा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 12:18 IST2026-02-07T12:16:37+5:302026-02-07T12:18:00+5:30
पंचायती, पालिकांसह नागरिकांचे टोचले कान : फोंड्यातून राज्यव्यापी 'सरकार तुमच्या दारी' उपक्रमाचा दुसरा टप्पा सुरू

कचऱ्याबाबत जबाबदारीने वागा : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : राज्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रत्येकाने स्वच्छतेवर भर देण्याची गरज आहे. मात्र स्वच्छतेचे काम केवळ पंचायत, पालिकांचे नसून नागरिकांनीही कचऱ्याबाबत जबाबदारीने वागण्याची गरज आहे. सरकार स्वच्छतेसाठी वर्षाला तब्बल ५०० कोटी रुपये खर्च करते. ही रक्कम केवळ कचरा जमा करण्यासाठी खर्च होते. त्यामुळे घरातील कचरा रस्त्यावर फेकून बेजबाबदारपणे वागू नका, असे आवाहन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले.
फोंडा तालुक्यातील नागरिकांसाठी 'सरकार तुमच्या दारी' या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे आयोजन येथील राजीव गांधी कला मंदिरात केले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर वीजमंत्री सुदिन ढवळीकर, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे, दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अॅग्ना क्लिट्स, मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, फोंड्याचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर, राजीव गांधी कला मंदिराचे अध्यक्ष रितेश नाईक यांच्यासह नगरसेवक, पंचायत प्रतिनिधी व अन्य मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काही काळ राजीव गांधी कला मंदिरमध्ये मंत्री व आमदारांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांचे तत्काळ निवारण केले. यावेळी 'माझे घर' योजनेअंतर्गत अर्जाचे वितरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले.
न्यूरोसर्जन मिळेनात...
'फोंडा येथील उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये काही समस्या अजूनही आहेत. याचबरोबर हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जन उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. आयडी हॉस्पिटलमध्ये न्यूरोसर्जनसाठी जाहिरात देऊनही कोणी काम करायला तयार नाही. जर कोणी येथे नोकरीसाठी तयार असेल तर तसे सांगावे. लवकरच आपण फोंड्यातील आरोग्याच्या समस्या दूर करू' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भाटीकर यांनी घेतली भेट
फोंड्याचे सामाजिक कार्यकर्ते डॉ. केतन भाटीकर यांनी राजीव कला मंदिरामध्ये सरकार तुमच्या दारी कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेत फोंडा उपजिल्हा हॉस्पिटलमधील आरोग्य सुविधा, तज्ज्ञ डॉक्टरांचा विषय मांडला. राजीव कला मंदिर समितीवर एकही महिला कलाकाराची नेमणूक का केली नाही? अशी विचारणा त्यांनी केली. सरकारने कर्मचारी भरती आयोगमार्फत सुरू केलेल्या नोकर भरतीच्या निर्णयाचे त्यांनी कौतुक केले. आयोगामार्फतच भरती व्हावी असे ते म्हणाले.
रवी नाईक यांचे स्वप्न पूर्ण करू
मुख्यमंत्री म्हणाले की, 'फोंड्याचे आमदार तथा दिवंगत कृषिमंत्री रवी नाईक यांचा फोंड्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास होता. त्यांची अपूर्ण विकासकामे पूर्ण करून स्वप्न साकारण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे. फोंड्यात सिटी बसस्थानक, बायपास रस्ता, मासळी बाजार उभारण्याच्या मागण्यांकडे गांभीर्याने पाहून हे प्रकल्प लवकरच हाती घेऊ.' मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोव्याचा सर्वांगीण विकास करणे हे केंद्र सरकारचे व्हिजन असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील २५ वर्षांसाठी विकासाचा आराखडा तयार केला आहे. नागरिकांना चांगल्या सुविधांसाठी मुख्यमंत्री म्हणून मी सातत्याने काम करत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनीही जबाबदारी ओळखून जनतेची सेवा केली पाहिजे.'
लोकांना उंबरठे झिजवावे लागू नयेत
'सरकार तुमच्या दारी' उपक्रमाला फोंड्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. एखाद्या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत, यासाठी हा उपक्रम सर्वप्रथम फोंड्यात राबवण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधकांनी विकासावर टीका करण्याऐवजी गेल्या दहा वर्षांत गोव्यात झालेला विकास पाहावा,' असा टोलाही त्यांनी लगावला.
मुख्यमंत्र्यांची संकल्पना : मंत्री सुदिन ढवळीकर
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले की, 'फोंड्यातील नागरिकांचे प्रश्न, समस्या एका दिवसात सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून 'सरकार तुमच्या दारी' हा उपक्रम साकारला.
दरमहा आढावा : मंत्री सुभाष शिरोडकर
सहकारमंत्री सुभाष शिरोडकर म्हणाले की, 'फोंडा तालुका विकासाबाबत राज्यात अग्रस्थानी असला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकाऱ्यांच्या समन्वयाची जोड हवी. दर महिन्याला पूर्ण झालेल्या व प्रलंबित कामांचा आढावा घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.'