सब्र करो, ये दिन भी गुजर जाएंगे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2025 09:38 IST2025-10-23T09:38:19+5:302025-10-23T09:38:19+5:30
भावनांचा हा नियम सर्वांना लागू पडतो. माणूस अनुकूल व प्रतिकूल अशा परस्पर विरोधी प्रसंगात स्वतःला जुळवून घेतो.

सब्र करो, ये दिन भी गुजर जाएंगे...
मधुसूदन बोरकर, एनएलपी ट्रेनर, फोंडा
जीवनात भव्यदिव्य करून दाखवण्याची ईर्षा प्रत्येक खेळाडूमध्ये असते. एखाद्या जागतिक क्रीडा स्पर्धेत आपण एखादा विक्रम करावा अशी महत्त्वाकांक्षा खेळाडूंमध्ये असायलाच हवी. एकदा का हा विक्रम झाला की ते पद टिकवण्यासाठी खेळाडू सतत प्रयत्नशील असतो. आपल्या नावावर असलेला रेकॉर्ड कुणी मोडू नये या ईर्षेने तो खूप परिश्रम घेतो.
आपले जेतेपद टिकविण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागतो. कारण मिळवलेले यश टिकवणे खूप महत्त्वाचे असते. यातून जीवघेणी स्पर्धा सुरू होते आणि जिंकल्याचा आनंद निघून जातो. जिंकल्यावर मिळालेला आनंद आणि हा आनंद टिकवून ठेवण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अशी द्विधा मनःस्थिती होते. जीवनात मिळालेल्या आनंदाबद्दल, यशाबद्दल अनेकदा आपल्या मनात संभ्रम उत्पन्न होतो तो असा.
एका मोठ्या स्पोर्टस इव्हेंटमध्ये भाग घेतलेल्या एका स्पर्धक टीमचे खेळाडू नाचगाण्याच्या तालावर फटाके लावत रस्त्याने चालले असताना त्यांना एकाने विचारले की, ट्रॉफी तुम्हाला मिळाली की काय? त्यावर या ग्रुपमधल्या एका खेळाडूने उत्तर दिले, 'नाही. आम्हाला विजेतेपद मिळालेले नाही.' त्यावर त्या माणसाने विचारले, 'मग तुम्ही फटाके कशाला लावता आहात? त्यावर तो तरुण म्हणाला, 'आमच्या टिमशी स्पर्धा करणारा आमचा प्रतिस्पर्धी संघ स्पर्धेतून बाहेर पडला. तोच आनंद आम्ही सेलिब्रेट करीत आहोत.'
एखादी स्पर्धा जिंकल्यावर आनंद साजरा करणे हे स्वाभाविक आहे. पण आपला प्रतिस्पर्धी स्पर्धेतून अपात्र होणे याला आनंद म्हणता येईल का? अशा वृत्तीला इंग्रजीत 'शेडन फ्रेऊड वृत्ती' म्हणतात. अर्थात दुसऱ्या व्यक्तीच्या अपयशामुळे किंवा पराभवामुळे होणारा आनंद असा याचा अर्थ होतो.
जीवनात सातत्यपूर्ण बदल घडून येत असतात, मानवी भावनांचेही तसेच. भावना कायम कधीच टिकत नसतात. आजचा दिवस दुःखाचा असला तर उद्याचा दिवस आनंद घेऊन येत असतो. आनंद व दुःख माणसाच्या जीवनात पाठशिवणीचा खेळ खेळत असतात. यामुळेच तर जीवनाचा समतोल राखला जातो. उद्याच्या पोटात काय दडले आहे, ते कुणालाच सांगता यायचे नाही. परवा कधीतरी स्थानिक दैनिकात एक बातमी वाचली. छायाचित्रात आपल्या छोट्या मुलीला कडेवर घेऊन हसतमुख चेहऱ्याची एक महिला उभी होती. एका शंभर रुपयाच्या लॉटरी तिकिटाने तिचं जीवनच उजळून टाकलं. तिच्या चेहऱ्यावरचे ते स्माइल बघून मी मनोमन म्हटले, भगवान देता है तो छप्पर फाड के देता है...!
आपल्या शरीराला एखादी लहान जखम झाली किंवा बोट कापले तर औषध न घेताही ही जखम नैसर्गिकरित्या सहज भरून येण्याची क्षमता आपल्या शरीरात असते. मनाच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. क्लेश, दुःख किंवा इतर मानसिक विवंचना यांच्याबाबतीत तसेच होते. वाईट प्रसंग, दुःखाचा काळ कधीच कायम राहात नसतो. दुःखाची तीव्रता कालांतराने कमी होत जाते. आनंदाच्या बाबतीतही तसेच होते. म्हणजे, आनंदाचा परमोच्च बिंदू सतत त्या जागी न राहाता तो खाली वर होत असतो. सुरुवातीला खूप आनंद देणारे क्षण कालांतराने सामान्य वाटायला लागतात. त्यामुळे आनंदाच्या परिसीमा खूप रुंदावतात. उदा. नवीन दुचाकी घेतल्यावर आपल्याला आनंद होतो. सुरुवातीचे काही दिवस आपण तिला खूप सांभाळतो. धुतो पुसतो. तिला सतत जपतो. पण काही दिवसांनी सुरुवातीची ही नवी नवलाई ओसरते.
भावनांचा हा नियम सर्वांना लागू पडतो. माणूस अनुकूल व प्रतिकूल अशा परस्पर विरोधी प्रसंगात स्वतःला जुळवून घेतो. याला शास्त्रीय भाषेत हेडोनिक अॅडॉप्टेशन किंवा हेडोनिक ट्रेडमिल असा शब्दप्रयोग वापरला जातो. अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे दुःखाची तीव्रता जस जसा काळ जातो तसतशी कमी होऊन माणूस नॉर्मल होतो. आनंदाच्या बाबतीतही तसेच होते. ट्रेडमिलवर चालणारा माणूस चालतच असतो; परंतु तो त्याच जागी म्हणजे पूर्वीच्याच ठिकाणी असतो. प्रत्येकाच्या जीवनात आनंदाचे क्षण येतात तसेच दुःखाच्या मोठमोठ्या प्रसंगांनाही तोंड द्यावे लागते.
आपण एकदम नवीन घरात राहायला जातो तेव्हा सुरुवातीचे काही दिवस चुकल्या-चुकल्या सारखं होऊन मन अस्थिर व्हायला लागते. रात्री-अपरात्री झोपमोड होते. घरात एखाद्या सदस्याचा मृत्यू झाल्यावर जे वातावरण तयार होते, त्यामुळे घरात एक प्रकारची अवकळा पसरते. पण परिस्थितीत सुधारणा होऊन सगळे पूर्वीसारखे होते. वाईट दिवस जाऊन चांगले दिवस येतात. एका शायरने म्हटलं आहे, 'सब्र करो, ये दिन भी गुजर जाएंगे, वक्त के दिये घाव ही तो है, वक्त के साथ ये भी भर जाएंगे...'