श्रीपादभाऊंच्या निवासस्थानी धडक; चिंबलवासीयांचा युनिटी मॉलप्रश्नी अल्टिमेटम, नाईक यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 09:54 IST2026-01-26T09:52:39+5:302026-01-26T09:54:12+5:30

मोर्चात चिंबलच्या २०० हून अधिक ग्रामस्थांचा समावेश होता.

attack on shripad bhau residence chimbal residents issue ultimatum on unity mall issue naik discusses with chief minister | श्रीपादभाऊंच्या निवासस्थानी धडक; चिंबलवासीयांचा युनिटी मॉलप्रश्नी अल्टिमेटम, नाईक यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

श्रीपादभाऊंच्या निवासस्थानी धडक; चिंबलवासीयांचा युनिटी मॉलप्रश्नी अल्टिमेटम, नाईक यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: युनिटी मॉलप्रश्नी आपली भूमिका स्पष्ट करा. या विषयावर तुम्ही पक्षासोबत आहात की मतदारांसोबत राहणार, हे आपण सांगा, अशी मागणी करत चिंबलवासीयांनी रविवारी उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या सापेंद्र येथील निवाससस्थानासमोर ठिय्या मांडला. दरम्यान, मंत्री नाईक हे पणजीमध्ये एका कार्यक्रमास गेल्यानंतर लोकांनी त्यांच्या घरासमोरच ठिय्या मारला. आम्हाला उत्तर मिळेपर्यंत मागे हटणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

नाईक यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत आपण मुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा केल्याचे सांगितले. मात्र, ठोस आश्वासन न मिळाल्याने आंदोलकांनी नाराजी व्यक्त केली. भाऊंनी युनिटी मॉलचा विषय पंतप्रधानांसह केंद्राकडे मांडावा अशी मागणी चिंबलवासीयांनी केली.

मोर्चात चिंबलच्या २०० हून अधिक ग्रामस्थांचा समावेश होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाईक यांच्या निवासस्थानी आंदोलनादरम्यान बोलताना अजय खोलकर म्हणाले की, श्रीपाद नाईक हे अनेक वर्षापासून उत्तर गोव्याचे खासदार आहे. केंद्रात मंत्रीदेखील आहेत. त्यामुळे त्यांनी चिंबलच्या लोकांच्या मागणीची दखल घेणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. आता ते आपण लोकांसोबत असून त्यांना नको असला तर प्रकल्प होणार नाही असे म्हणतात. आम्हाला केवळ घोषणा नको तर प्रकल्प रद्द व्हायला हवा आहे. ते आमच्या मतांवर निवडून येतात. या विषयावरून ते भाजपबरोबर राहणार की मतदारांसोबत हे जाहीर करावे,' अशी मागणी त्यांनी केली.

प्रकल्प रद्द करणार कसे म्हटले?

चिंबल येथील युनिटी मॉल प्रकल्प रद्द होणार नाही, त्यावर २५ कोटी रुपये खर्च झाले असे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे. मग, पर्यावरणाला हानी होत असेल तर सदर प्रकल्प रद्द केला जाऊ शकतो, असे श्रीपाद नाईक यांनी कसे म्हटले? जर तसे असेल तर त्यांनी यापूर्वीच हे विधान का केले नाही? आंदोलनस्थळी ते का आले नाहीत ? असा प्रश्न चिंबलवासीयांनी केला.

प्रकल्पाबाबत अंधारात का ठेवले?

अजय खोलकर म्हणाले की, 'युनिटी मॉल हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर निर्णय होईल. लोकांना नको असेल तर मलाही नको असे श्रीपाद नाईक म्हणतात. तुम्ही तर केंद्रात मंत्री आहात, तर मग तुम्ही आम्हाला या प्रकल्पाबाबतची कल्पना का दिली नाही ? अंधारात का ठेवले ? हे सांगावे.

... पर्यावरणाची हानी होत असेल तर युनिटी मॉल रद्द करू : श्रीपाद नाईक

सरकार जनतेच्या मागण्यांबाबत संवेदनशील आहे. मात्र, युनिटी मॉल हा केंद्र सरकारचा प्रकल्प असल्याने त्याबाबतचा कोणताही निर्णय केंद्राशी सल्लामसलत करूनच घेतला जाईल. पर्यावरणाला हानी होत असल्यास युनिटी मॉल प्रकल्प रद्द करू, असे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी नमूद केले. मी लोकांसोबत आहे. जर या प्रकल्पामुळे खरेच पर्यावरणाची हानी होत असेल तर तो रद्द केला जाऊ शकतो, असे ते म्हणाले. 

मंत्री नाईक म्हणाले, की युनिटी मॉल प्रकल्पाबाबत सर्व पैलूंचा अभ्यास करूनच निर्णय घेतला जाईल. राज्य सरकारने यासंदर्भात कोणताही निर्णय घेतल्यास त्याची जबाबदारी केंद्र सरकारवर राहील. कारण हा प्रकल्प केंद्र सरकारचा आहे. ग्रामस्थांकडून मांडण्यात येणाऱ्या पर्यावरणीय हानीच्या दाव्यांबाबत सरकार गंभीर आहे. जनतेच्या मागण्यांबाबत आपण संवेदनशील आहे. प्रकल्पामुळे खरोखरच पर्यावरणाला हानी पोहोचत असल्याचे सिद्ध झाले, तर सरकार हा प्रकल्प रद्द करेल आणि जनतेच्या पाठीशी मी उभा राहीन. तथापि, कोणताही अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करण्यात येईल. त्यानंतरच पुढील पावले उचलली जातील' असे मंत्री नाईक यांनी नमूद केले.

आज पुन्हा आंदोलन

युनिटी मॉल प्रकल्पाविरोधात आज, प्रजासत्ताकदिनी २६ रोजी पुन्हा एकदा आंदोलन करण्याची घोषणा चिंबलवासीयांनी केली. गोवा विद्यापीठाच्या मैदानावर सकाळी प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमावेळी शांततापूर्ण निदर्शने करू असे त्यांनी जाहीर केले आहे.

या विषयावर गप्प का? : गोविंद शिरोडकर

गोविंद शिरोडकर म्हणाले की, 'एसटींना राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी उत्तर गोवा खासदार म्हणून श्रीपाद नाईक यांनी निश्चितच आम्हाला मदत केली, यात कुठलीही शंका नाही. मग नेमके युनिटी मॉल प्रकल्पाबाबतच तुम्ही मौन का बाळगत आहात? आमचा गाव, डोंगर, शेती आम्हाला पाहिजे असे गोविंद शिरोडकर म्हणाले.
 

Web Title : चिंबल निवासियों ने श्रीपद नाइक से यूनिटी मॉल पर स्पष्टता मांगी

Web Summary : चिंबल निवासियों ने श्रीपद नाइक के आवास पर यूनिटी मॉल परियोजना पर स्पष्टता की मांग करते हुए विरोध प्रदर्शन किया। वे आश्वासन चाहते हैं कि इससे पर्यावरण को नुकसान नहीं होगा और नाइक से पार्टी लाइनों पर निवासियों की चिंताओं को प्राथमिकता देने का आग्रह किया। नाइक ने कहा कि पर्यावरण को नुकसान साबित होने पर परियोजना पर पुनर्विचार किया जाएगा।

Web Title : Chimbel Residents Demand Unity Mall Clarity from Shripad Naik

Web Summary : Chimbel residents protested at Shripad Naik's residence, demanding clarity on the Unity Mall project. They seek assurance it won't harm the environment and want Naik to prioritize residents' concerns over party lines. Naik stated the project will be reconsidered if environmental damage is proven.