विधानसभा होणार पेपरलेस
By Admin | Updated: July 20, 2014 01:40 IST2014-07-20T01:37:52+5:302014-07-20T01:40:42+5:30
पणजी : कागदविरहित विधानसभा अधिवेशनाच्या संकल्पनेला आमदारांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता, पावसाळी अधिवेशन ९५ टक्के पेपरलेस होणार

विधानसभा होणार पेपरलेस
पणजी : कागदविरहित विधानसभा अधिवेशनाच्या संकल्पनेला आमदारांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता, पावसाळी अधिवेशन ९५ टक्के पेपरलेस होणार असल्याचा विश्वास सभापती राजेंद्र आर्लेकर यांनी व्यक्त केला आहे. माजी मुख्यमंत्री आमदार दिगंबर कामत यांनी आपले १०० टक्के प्रश्न, तर आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सर्वाधिक प्रश्न आॅनलाईन पद्धतीने पाठविले आहेत.
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २२ जुलै ते २१ आॅगस्ट या दरम्यान होणार असून २१ दिवसांच्या या अधिवेशनासाठी आतापर्यंत ७२० तारांकित, तर १२८० अतारांकित प्रश्न आले आहेत. १११८ प्रश्न हे आॅनलाईन पद्धतीने आले आहेत. प्रत्येक आमदाराला त्याच्या नावाचे लॉग इन व पासवर्ड देण्यात आला आहे. त्याद्वारे आपला प्रश्न ते आॅनलाईन पद्धतीने थेट सभापतींना विचारू शकतात. त्यामुळे आता बॅलट पेपरमध्ये प्रश्न टाकण्याची गरज राहिलेली नाही.
या आॅनलाईन सुविधेच्या पहिल्या मॉड्युलचा जास्तीत जास्त वापर हा आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स, दिगंबर कामत व गणेश गावकर यांनी केला असून त्यांनी सर्वांत अधिक प्रश्न विचारले आहेत. आॅनलाईन पद्धतीने प्रश्न विचारण्यासाठी तसेच उत्तरे पाहण्यासाठी आमदारांना प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती सभापतींकडून देण्यात आली. विधानसभा सदस्यांना लॅपटॉप पुरविण्यात आले असून ते सर्व्हरद्वारे जोडण्यात येतील. तसेच आमदारांना देण्यात आलेले टॅबलेटही ते वापरू शकतील, अशी माहिती त्यांनी दिली.
(प्रतिनिधी)