तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 08:37 IST2025-11-12T08:36:55+5:302025-11-12T08:37:48+5:30
नेवरा येथे योजनेसाठीच्या अर्जाचे वितरण

तुमच्या घराला विरोध करणाऱ्यांना जाब विचारा; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : 'माझे घर' योजनेला विरोध करून तुमची घरे कायदेशीर करण्यासाठी आडकाठी आणणाऱ्यांना लक्षात ठेवा आणि जाबही विचारा' असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल योजनेच्या अर्जदारांना केले. सांत - आंद्रे मतदारसंघातील नेवरा पंचायतीसमोर झालेल्या अर्ज वितरण कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर, माजी आमदार फ्रान्सिस सिल्वेरा उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'न्यायालयाच्या आदेशानंतर घरे पाडण्याच्या नोटिसा मिळाल्यामुळे हवालदिल झालेल्या गोमंतकीयांची घरे राखण्यासाठी सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. त्यासाठी आवश्यक कायदा दुरुस्ती करून 'माझे घर' योजना लागू करण्यात आली. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा. पण, या योजनेला विरोध करून तुमची घरे पाडून टाकण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्या लोकांना वेळीच ओळखा. जे कोण या योजनेला विरोध करीत आहेत, त्यांना ओळखा आणि लक्षात ठेवा' असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी योजनेला विरोध करणारे लोक कोण आहेत? असा प्रश्न व्यासपीठावरून उपस्थितांना विचारला, तेव्हा लोकांनी काँग्रेस, आम आदमी पार्टी, गोवा फॉरवर्ड आणि रिव्होल्यूशनरी गोवन्स अशी नावे घेतली. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, 'हे लोक तुमच्या घरी आले तर त्यांना याचा जाब विचारा.' त्यावेळी उपस्थितांनी नक्कीच विचारू असे सांगितले.
योजना रोखण्यासाठी कोर्टात गेलेत
'आमचे सरकार लोकांची घरे राखण्यासाठी धडपडत आहे आणि त्यासाठी योजनाही बनवून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. असे असताना विरोधकांनी ही योजना बंद पाडण्यासाठी काही लोकांना न्यायालयात पाठविले आहे. त्यांनी सरकारच्या योजनेला आव्हान दिले आहे. परंतु सरकार लोकांची घरे राखण्यास कटिबद्ध आहे' असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
'त्या' भाटकारांचेही अभिनंदन : सावंत
'माझे घर योजनेंतर्गत सरकारी जमिनीतील, कोमुनिदादच्या मालकीच्या जमिनीतील घरे कायदेशीर केली जाणार आहेत. तसेच भाटकाराच्या जमिनीतील जुनी घरेही कायदेशीर केली जाणार आहेत. या योजनेला काही भाटकारांनी विरोध केला असला तरी अनेकांनी योजनेला समर्थन दिले आहे. काही भाटकारांनी तर स्वतःहून आपल्या कुळांची घरे असलेली जागा त्यांना देऊन टाकल्या. असे भाटकार अभिनंदनास पात्र आहेत', असे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.