कलाकारांनी जपली 'कुणबी' अस्मिता : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 08:17 IST2025-08-08T08:16:01+5:302025-08-08T08:17:00+5:30
पारंपरिक वस्त्रोद्योगातील कलाकारांचे कौतुक केले.

कलाकारांनी जपली 'कुणबी' अस्मिता : मुख्यमंत्री प्रमोद सावंत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: कुणबीमुळे राज्याची वेगळी ओळख तयार झाली आहे. कुणबी साडी तयार करणे सोपे नाही. पण, राज्यातील पारंपरिक वस्त्रोद्योगातील कलाकारांनी ही कला जपत आपले उत्कृष्ट काम या प्रदर्शनातून दाखवून दिले आहे. त्यामुळे कुणबीची अस्मिता केवळ या कलाकारांच्या प्रयत्नामुळे जपली गेली आहे, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
पर्वरी येथील विधानसभेत काल, गुरुवारी ११ व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित 'कुणबी द प्राईड ऑफ गोवन टेक्स्टाईल' या हातमाग प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत सभापती रमेश तवडकर, आमदार कृष्णा साळकर व इतर मान्यवर उपस्थित होते. यादरम्यान सभापती रमेश तवडकर, आमदार कृष्णा साळकर यांनीदेखील पारंपरिक वस्त्रोद्योगातील कलाकारांचे कौतुक केले.
खांद्यावर कुणबी शाल
विधानसभा अधिवेशनाच्या कामकाजात कुणबी शाल दिसून आली. प्रत्येक सत्ताधारी आमदारांच्या खांद्यावर ही कुणबी शाल होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर यांनीदेखील कुणबी शाल परिधान केली होती.
हातमाग प्रदर्शनाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. कलाकारांची मेहनत आणि निष्ठा या प्रदर्शनामध्ये प्रत्येक वस्तूत दिसून येते. आमचे सरकार कुणबीचा प्रचार व प्रसार करीत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कुणबी कलेला पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून येणाऱ्या दिवसांमध्ये कुणबी कलेला नक्कीच संजीवनी प्राप्त होणार आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.