राज्य हादरले; बिट्स पिलानीत आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 09:46 IST2025-09-05T09:46:15+5:302025-09-05T09:46:46+5:30

वसतिगृहातील खोलीत पलंगावर आढळला मृतदेह

another student dies in bits pilani goa | राज्य हादरले; बिट्स पिलानीत आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

राज्य हादरले; बिट्स पिलानीत आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को : साकवाळ-झुआरीनगर येथील बिट्स पिलानी कॉलेज कॅम्पसमध्ये काल आणखी एका २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राज्य हादरले. गेल्या दहा महिन्यांतील ही पाचवी घटना आहे. ऋषी नायर असे त्याचे नाव असून वसतिगृहातील खोलीतील पलंगावरच त्याचा मृतदेह आढळून आला.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ११.३० वाजता ही घटना उघडकीस आली. ऋषी हा या ठिकाणी 'एमएसस्सी फिजिक्स'च्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. गुरुवारी (दि. ४) सकाळी ऋषीचे वडील त्याला सतत फोन करत होते. मात्र, तो उत्तर देत नसल्याने वडिलांनी तातडीने कॅम्पसमधील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून ऋषी आपला फोन उचलत नसून त्याची माहिती घेण्यास सांगितले. त्यानंतर काही कर्मचारी ऋषी रहात असलेल्या वसतिगृहात पोहोचले. यावेळी त्यांनी ऋषीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने शेवटी कॅम्पसमधील त्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच खोलीचा दरवाजा उघडला. त्यावेळी ऋषी मृतावस्थेत पलंगावर पडून असल्याचे आढळून आले.

वेर्णा पोलिसांना घटनास्थळी दाखल होऊन ऋषीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवचिकित्सेसाठी पाठवून दिला. तसेच कॅम्पसमध्ये चौकशीला सुरवात केली. मृत्यूपूर्वी ऋषीने खोलीत उलटी केल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याच्या मृत्यूचे कारण उघड झाले नसले तरी त्याने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. शवचिकित्सेनंतर कारण स्पष्ट होईल. ऋषीचे आई-वडील गोव्यात राहत असून वडिलांना तातडीने कॅम्पसमध्ये बोलवण्यात आले.

काही महिन्यांपूर्वी ऋषी गोव्याच्या बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये 'एमएससी फिजिक्स'च्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी आला होता. यापूर्वी त्याने हैदराबाद येथील कॅम्पसमध्ये पहिल्या वर्षाचे शिक्षण घेतल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी ऋषीच्या जवळच्या मैत्रिणीने आत्महत्या केली होती. या घटनेनंतर ऋषी नैराश्यात गेल्याचे तपासात समोर आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर उपचारही सुरू होते, अशी माहिती मिळाली आहे. ऑगस्ट महिन्यात ऋषी बिट्स पिलानीमध्ये आला होता. पहिल्या वर्षाचे शिक्षण त्याने हैदराबाद येथे घेतले. घटनेची माहिती मिळताच डीआयजी वर्षा शर्मा, दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टीकम सिंग वर्मा, पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम, पोलिस उपअधीक्षक गुरुदास कदम यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ऋषीने आत्महत्याच केली असावी, असा संशय आहे.

दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती: मुख्यमंत्री

बिट्स पिलानीमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच अहवाल मिळाल्यानंतर सरकार पुढील पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जाहीर केले.

झुवारीनगर येथील बिट्स पिलानी संस्थेत शिक्षण घेणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा गेल्या वर्षभरात गुढ मृत्यू झाल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर सायंकाळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना यासंबंधी विचारले असता ते म्हणाले की, काल मृतावस्थेत आढळलेला २० वर्षीय विद्यार्थी बंगळुरुचा आहे. मी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीला लवकरच अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. याशिवाय पोलिस वेगळी चौकशी करतील.

उत्तर गोव्यातही समिती स्थापन करणार

उत्तर गोव्यातही जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली अशीच समिती स्थापन केली जाईल, जेणेकरून एखाद्या शैक्षणिक संस्थेत असे काही प्रकार घडले तर या समितीतर्फे चौकशी करता येईल. वरील घटनेची माहिती मिळाल्यानंतर मला अत्यंत वाईट वाटले. मी फोन करून यासंबंधी अधिक माहिती घेतली. अशा प्रकारच्या घटना कुठल्याही शैक्षणिक संस्थेत होऊ नयेत यासाठी सरकार दक्ष राहील. अहवाल आल्यानंतर मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याबाबत विचार करू, असे मुख्यमंत्री म्हणाले.

अवघ्या दहा महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू

गेल्या १० महिन्यांत बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या तीन घटनांत विद्यार्थ्यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली. डिसेंबर २०२४ मध्ये पहिली घटना घडली. त्या विद्यार्थ्यांने गळफास लावून आत्महत्या केली होती, त्यानंतर मार्च २०२५ मध्ये अन्य एका विद्यार्थ्यांने गळफास लावला. मे २०२५ मध्ये तिसऱ्या विद्यार्थ्यांनेही आत्महत्या केली. १६ ऑगस्ट २०२५ रोजी कुशाग्र जैन नामक विद्यार्थ्यांचा पलंगावर मृतदेह आढळून आला. पोलिस या प्रकरणात तपास करत आहेत. तर काल २० वर्षीय ऋषी नायर या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला.

Web Title: another student dies in bits pilani goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.