गुगल मॅपने केला घात, कुंडई येथे पुन्हा एक अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 17:03 IST2024-03-24T17:02:48+5:302024-03-24T17:03:25+5:30
कुंडई मुख्य महामार्गावर झालेल्या अपघातात कार व दुचाकीच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला.

गुगल मॅपने केला घात, कुंडई येथे पुन्हा एक अपघात
फोंडा : कुंडई येथील औद्योगिक वसाहतीजवळील सर्कल परिसरात गुगलवरील मॅपमध्ये चुकीचे दिशानिर्देश दाखवत असल्याने कायम अपघात होत असतात. खास करून पर्यटकांना कुठे जायचे ते माहीत नसल्याने ते गुगल मॅपचा वापर करतात आणि फसतात. ही तांत्रिक बाब वेळीच दुरुस्त न झाल्यास येथे अपघात वाढण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. अशाच एका अपघातात युवक जखमी झाला.
कुंडई मुख्य महामार्गावर झालेल्या अपघातात कार व दुचाकीच्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. निखिल नाईक (३२, रा. खांडेपार) असे त्याचे नाव आहे. त्याला लगेच इस्पितळात उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. कर्नाटक राज्यातून पर्यटनासाठी आलेल्या कारने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक झाली.
उपलब्ध माहितीनुसार कर्नाटकातील कार चालकाला एकेरी रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याने चुकीच्या मार्गाने गाडी भरधाव चालवली. त्यामुळे हा अपघात झाला. म्हार्दोळ पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून, जखमीची प्रकृती सुधारत असल्याची माहिती देण्यात आली.