हे सर्व ढवळीकरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी; पूजा नाईकच्या आरोपांवर विजय सरदेसाई यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 12:22 IST2025-11-16T12:20:42+5:302025-11-16T12:22:02+5:30
सरदेसाई म्हणाले की, पूजा नाईक ही पीडित नसून नोकरीकांड प्रकरणातील मुख्य संशयित आहे.

हे सर्व ढवळीकरांना नियंत्रणात ठेवण्यासाठी; पूजा नाईकच्या आरोपांवर विजय सरदेसाई यांचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकरीकांड प्रकरणात पूजा नाईक हिने वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे नाव घेणे हा निवडणुकीच्या काळात ढवळीकर यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी भाजपचा खटाटोप सुरू आहे, असा खळबजनक दावा काल गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.
सरदेसाई म्हणाले की, पूजा नाईक ही पीडित नसून नोकरीकांड प्रकरणातील मुख्य संशयित आहे. त्यामुळे ती काय सांगते ते खरे म्हणता येणार नाही. इतका काळ शांत असलेले हे प्रकरण नेमके आताच जिल्हा पंचायत निवडणुकीच्या काळात का उफाळून आले? ही विचार करण्याची गोष्ट आहे.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांची भुमिकाही संशयास्पद आहे. पूजाने ही नावे या आधीच घेतली होती तर त्यावेळी का कारवाई केली नाही? असा प्रश्न सरदेसाई यांनी उपस्थित केला. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्रीही या घोटाळ्यास जबाबदार आहेत, असा आरोपही सरदेसाई यांनी यावेळी केला.
मंत्र्यांवर आरोप होणारच : फळदेसाई
पूजा नाईकच्या आरोपांबाबत मंत्री सुभाष फळदेसाई यांनी निवडणुका लागल्या की मंत्र्यांवर असे आरोप होत असतात, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. नोकरीसाठी ६१३ जणांकडून पैसे घेतल्याचे तिने सांगितले. मात्र, त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत. मग यातील निम्मे म्हणजेच किमान ३०० जणांनी तरी तिच्या घरी पैसे मागण्यासाठी जायला हवे होते. गोंधळ व्हायला हवा होता. पण, असे काहीच झाले नाही. गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्री या प्रकरणातील सत्य बाहेर आणतील, असेही फळदेसाई म्हणाले.