'एआय' प्रश्नपत्रिका ठरू शकेल गेमचेंजर; कॉलेजच्या विद्यार्थ्याने तयार केले अनोखे सॉफ्टवेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 08:23 IST2025-03-20T08:23:18+5:302025-03-20T08:23:18+5:30

ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर नजीकच्या भविष्यात पेपरफुटीमुळे निर्माण होणारी समस्या टळू शकेल.

ai question paper could be a game changer goa college student creates unique software | 'एआय' प्रश्नपत्रिका ठरू शकेल गेमचेंजर; कॉलेजच्या विद्यार्थ्याने तयार केले अनोखे सॉफ्टवेअर

'एआय' प्रश्नपत्रिका ठरू शकेल गेमचेंजर; कॉलेजच्या विद्यार्थ्याने तयार केले अनोखे सॉफ्टवेअर

धीरज हरमलकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : नव्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल आधारित प्रश्नपत्रिका सेटर आणि सुरक्षा सॉफ्टवेअर म्हापशातील सेंट झेवियर कॉलेजच्या विद्यार्थ्याने विकसित केले आहे. कळंगुट येथील भिकाजी गावडे असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. तो 'एआय' आधारित मॉडेल आणण्याच्या कल्पनेवर काम करत आहे. ही संकल्पना प्रत्यक्षात आली तर नजीकच्या भविष्यात पेपरफुटीमुळे निर्माण होणारी समस्या टळू शकेल. तातडीने एकापेक्षा अधिक प्रश्नपत्रिका तयार करून मिळू शकतील.

सध्या विविध परीक्षांसाठी विशिष्ट विषयांचे शिक्षक प्रश्नपत्रिका तयार करतात. त्यामुळे पेपरफुटीसारख्या प्रकाराचा धोका आहे. गेल्यावर्षी 'नीट' परीक्षेदरम्यान आणि नुकताच गोवा विद्यापीठात पेपरफुटीचा कथित प्रकार घडला आहे. अशा घटनांमुळे संबधित संस्थेची प्रतिष्ठा खराब होते आणि संस्थेच्या विश्वासार्हतेवर, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होते. असे प्रकार टाळण्यासाठी, एआय आधारित प्रश्नपत्रिका सेटअप मॉडेल मदत करेल. परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्यांना एकापेक्षा अधिक प्रश्नपत्रिका त्वरित प्रदान करता येतील. त्यातील एक प्रश्नपत्रिका निवडून ती विद्यार्थ्यांना सोडवायला देता येईल, अशी या प्रोजेक्टची संकल्पना आहे.

कळंगुट येथील भिकाजी गावडे हा सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये बीएससी (इलेक्ट्रॉनिक्स) द्वितीय वर्षात शिकतो. त्याने ही संकल्पना २० जुलै २०२४ रोजी झालेल्या जागतिक स्टेम आणि रोबोटिक्स ऑलिम्पियाड (डब्लूएसआरओ) गोवा रिजनलमध्ये प्रथम सादर केली होती. नंतर १४ आणि १५ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदाबाद, गुजरात येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या प्रोजेक्टची निवड झाली. रियल-टाइम प्रश्ननिर्मिती, मूल्यमापनाच्या संकल्पनेला लोकांनी दाद दिली.

सॉफ्टवेअर करेल अनेक प्रश्नपत्रिका तयार

हे मॉडेल कसे काम करते याविषयी माहिती देताना भिकाजी याने सांगितले की, एआय आधारित मॉडेलमध्ये, अभ्यासक्रमाची पुस्तके, जुन्या प्रश्नपत्रिका असे सर्व विषयांचे साहित्य अपलोड केले जाईल. या माहितीच्या आधारे एआय आधारित सॉफ्टवेअर तत्काळ अनेक प्रश्नपत्रिका तयार करेल. या प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना परीक्षा हॉलमध्ये त्वरित पुरवल्या जाऊ शकतात. तसे झाल्यास पारदर्शकता येईल आणि पेपरफुटी, पक्षपातीपणा अशी समस्या उद्भवणार नाही.

इनोव्हेशन काउन्सिलमध्ये नोंद

भिकाजी याने सांगितले की, 'मी माझ्या नावीन्यपूर्ण संकल्पनेची नोंदणी गोवा स्टेट इनोव्हेशन कौन्सिलमध्ये नुकतीच केली आहे. व्हर्चुअल इनोव्हेशन रजिस्टर (व्हीआयआर) हा गोवा स्टेट इनोव्हेशन काउन्सिलचा एक उपक्रम आहे. यातून तरुणांना सृजनात्मक नावीन्यपूर्ण कल्पनांची नोंदणी करण्यासाठी आणि या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक साहाय्य दिले जाते.

विद्यार्थ्यांची मेहनत महत्त्वाची

या संकल्पनेविषयी गावडे याने सांगितले की, गेल्यावर्षी जेव्हा नीट परीक्षेचे पेपर फुटले, तेव्हा अनेक विद्यार्थी, पालकांना धक्का बसला. 'नीट'सारख्या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी खूप वेळ, पैसा खर्च करतात. कठोर मेहनत घेतात. जर पेपर फुटला तर त्यांचे सर्व प्रयत्न वाया जातात. त्यामुळे ही स्थिती टाळण्यासाठी मी ही संकल्पना आणली आहे.

Web Title: ai question paper could be a game changer goa college student creates unique software

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.