आरोग्यसेवेसाठी डिचोली दत्तक; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 07:32 IST2025-03-17T07:32:16+5:302025-03-17T07:32:58+5:30
मेगा आरोग्य शिबिराला मिळाला मोठा प्रतिसाद

आरोग्यसेवेसाठी डिचोली दत्तक; आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची घोषणा
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : राज्यातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुरक्षा कवच निर्माण केले जात आहे. घरोघरी आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येकाचे जीवन आरोग्यसंपन्न ठेवण्यासाठी सरकार कार्यरत आहे. डिचोलीत अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर उभारून आधुनिक सुविधा पुरवण्यावर आमचा भर आहे. हा तालुका आरोग्यसेवेसाठी दत्तक घेतला जाईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी केली. डिचोली येथे मेगा आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी राज्यात नवे ६० वैद्यकीय अधिकारी आणि ७५ रुग्णवाहिका असा सेवेचा विस्तार केला जाईल असे त्यांनी सांगितले. राज्यातील विविध हॉस्पिटल्सची निगा गोवा साधनसुविधा महामंडळातर्फे करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेत हा निर्णय झाला आहे असेही ते म्हणाले. गोवा वैद्यकीय महाहिविद्यालय, आरोग्य खाते, डेंटल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने डिचोलीतील सामाजिक आरोग्य केंद्रात झालेल्या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यासपीठावर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर. डॉ. रुपा नाईक, डॉ. आयता आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्यसेवा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. त्यासाठी आधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमचे सरकार हे हृदय असलेले व माणुसकी जपणारे आहे. आरोग्यसेवा सर्वधर्मियांच्या दारात मेणे हे आमचे कर्तव्य आहे. अंगणवाडी सेविका व इतर घटकांच्या माध्यमातून गावांतील आरोग्याची स्थिती समजत असते. आता रिलायन्स कंपनीमार्फत राज्यात ठिकठिकाणी कमांड सेंटर सुरू करून प्रत्येकाच्या आरोग्याबद्दल तपशील गोळा करून उपचार करणे सोपे होईल.' सिद्धी कासार यांनी आभार मानले. सिद्धी उपाध्ये यांनी सूत्रसंचालन केले.
डिचोली, मडकईत ऑपरेशन थिएटर
राणे म्हणाले की, 'डिचोली व मडकई येथे ऑपरेशन थिएटर लवकरच कार्यान्वित केले जाईल. २१२ आरोग्य उपकेंद्रात आधुनिक तंत्रज्ञान आणि १५ टेस्टिंग सुविधा करणारी मशिनरी उपलब्ध होतील. आरोग्य सेवा देताना सामान्य माणसाला प्रसंगी विमानाने इतर राज्यांत उपचारासाठी नेण्याची करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाईल.
पत्रकारांसाठी आरोग्य कार्ड
राज्यातील सर्व पत्रकारांसाठी आरोग्य कार्ड उपलब्ध करून त्यांना आधुनिक तपासणी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल अशी घोषणा त्यांनी केली. एखाद्या आजारावर उपचारासाठी मुंबई व इतर ठिकाणी जाण्याची गरज भासल्यास वैयक्तिक सहकार्य करू, असे ते म्हणाले.
महिलांनी नियमित तपासणी करावी
माझ्या वडिलांनी राज्याची खूप सेवा केली. वडिलांनी अनेक वर्षे मुख्यमंत्री म्हणून काम केले. आईने वेगवेगळ्या क्षेत्रात काम केले. मात्र स्वतःच्या आरोग्याकडे तिने दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले. माझ्या घरातच कॅन्सर रुग्ण आहे. त्यामुळे महिलांनी आरोग्याची नियमित तपासणी करावी असे आवाहन त्यांनी केले. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात आधुनिक सुविधांची गरज आहे. तेथे डॉक्टरांची संख्या वाढवावी, ऑपरेशन थिएटर सुरू करावे अशी मागणी केली. आरोग्य शिबिराला खूप मोठा प्रतिसाद लाभला. वेगवेगळ्या प्रकारच्या तपासण्या, महिलांची कॅन्सर व इतर आजारांवरील तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. आरोग्य तपासणी झालेल्या रुग्णांची नियमित तपासणी करण्यासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालय पाठपुरावा करेल असे सांगण्यात आले.