सच्चा, सडेतोड कार्यकर्ता
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 08:45 IST2025-11-05T08:45:33+5:302025-11-05T08:45:33+5:30
अशोक भोसले यांच्या निधनाची दखल कुणालाही घ्यावीच लागेल.

सच्चा, सडेतोड कार्यकर्ता
ओपिनियन पोल किंवा १९८७ ची कोंकणी राजभाषा चळवळ, अशा विविध आंदोलनांमधील जुन्या काळचे कार्यकर्ते आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. वयोमानानुसार काहीजण खूप थकले आहेत. तरीदेखील जे हयात आहेत, त्यांच्याकडून चळवळीचा इतिहास अनेकदा ऐकायला मिळतो. कोंकणीला राजभाषेचे स्थान मिळण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. व्यासपीठे गाजवणारे नेते सर्वांना ठाऊक असतात. त्यांच्या योगदानाचा गवगवा होतो. मात्र प्रेक्षकांमध्ये कार्यकर्ता या नात्याने बसणारे आणि भाषेवरील संकटसमयी जिवाची पर्वा न करता फिल्डवर उतरणारे खूप कमी असतात. अर्थात कोंकणी व मराठी या दोन्ही भाषांना गोव्यात अशा प्रकारचे तळमळीचे कार्यकर्ते लाभले आहेत. भाषावाद कधी संपणार नाही, तो सुरूच राहील, असे दिसते. मात्र अशोक भोसले यांच्या निधनाची दखल कुणालाही घ्यावीच लागेल.
कोंकणी चळवळीने एक सच्चा व सडेतोड कार्यकर्ता परवा गमावला आहे. ते एक सरकारी कर्मचारी म्हणून निवृत्त झाले होते. कवी व कथालेखक अशीही अशोक भोसले यांची ओळख होती. पणजीतील सरकारी प्रिंटिंग प्रेसमध्ये ते काम करायचे. उतारवयात खूप थकले होते; पण कोंकणीची धुंदी कायम होती. कोंकणीसाठी कधीही रस्त्यावर उतरण्याची त्यांची तयारी होती. पूर्वी सरकारी सेवेत असतानाही भाषाप्रश्नी त्यांनी कधी सत्ताधाऱ्यांची पर्वा केली नाही. एरवी कोंकणीतील काही म्हालगडे विद्यापीठातही पोहोचले तरी, आंदोलनात उतरत नाहीत. आपण सरकारी सेवेत आहोत, असे सांगतात.
स्वर्गीय शंकर भांडारी आकाशवाणीवर काम करायचे; पण त्यांनीदेखील प्रसंगी सरकारी नोकरीची पर्वा न करता चळवळीत उडी टाकली होती. तोच मार्ग अशोक भोसले यांनीही पत्करला होता. अर्थात आंदोलनात न उतरताही काहीजण कोंकणी-मराठीची सेवा करतात हा भाग वेगळा. काहीजण कसदार साहित्यनिर्मितीतून भाषेसाठी योगदान देत असतात. कोंकणीला राजमान्यता मिळाली नव्हती, त्या काळात सगळीकडे अंधार असताना पणती बनून तेवत राहण्याचे काम काही कार्यकर्त्यांनी निष्ठेने केले. अशोक भोसले वगैरेंचा समावेश अशा कार्यकर्त्यांमध्ये होतो. भाटले-पणजी येथे राहणारे अशोक भोसले व इतर दोघा-तिघांनी मिळून एकेकाळी मळ्यातील जत्रेवेळी पुस्तक प्रदर्शन व विक्रीचे काम केले होते. कोंकणी पुस्तके जनसामान्यांपर्यंत पोहोचावीत असा त्यांचा हेतू होता. त्यांना त्यांच्या योगदानासाठी काही पुरस्कारही मिळाले. मात्र त्यांनी विविध प्रकारची नऊ पुस्तके लिहून ती प्रकाशित केली होती, हे आजच्या पिढीतील कित्येकांना ठाऊक नसेल.
कलागौरव पुरस्कार देऊन सरकारच्या कला, संस्कृती खात्याने त्यांचा सन्मान केला होता. अशोक भोसले यांना एकच कन्या. तिनेच काल अशोक यांच्या शवाला अग्नी देत अंतिम संस्कार पार पाडले. कोंकणी चळवळीचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल, त्या त्या वेळी अशोक भोसले व अन्य काही सच्च्या कार्यकर्त्यांची दखल घ्यावीच लागेल. गोंय व गोंयकारपणाचे अशोक भोसले हे प्रामाणिक प्रेमी होते. राज्यात खरे म्हणजे कोंकणी-मराठी यांच्यातील समन्वय वाढायला हवा. सध्याच्या काळात अशा समन्वयाची अधिक गरज आहे. एकसुरी, जुने युक्तिवाद करून दोन्ही भाषांमधील वादी अजूनही भांडतात. नव्या पिढीला या वादाचे काही पडलेले नाही.
इंग्रजीचा प्रभाव वाढतच आहे. तरीही आपली संस्कृती, शिक्षण, भजन, आरत्या, साहित्यनिर्मिती या दोन्हीमध्ये कोंकणी-मराठी या दोन्ही भाषाभगिनी कायम राहायला हव्यात, टिकायला हव्यात. मराठी राजभाषा आंदोलन आता नव्याने व्याप्ती वाढवत आहे. मराठीवर सरकारी नोकरीत अन्याय होत आहे, असा दावा मराठीप्रेमी करत आहेत. त्याचा प्रतिवाद कोंकणीवाद्यांकडून केला जात आहे. मात्र अशा वादाने समाज दुभंगतोय. दोन गटांमध्ये कटुता येते. एकमेकांना शत्रू म्हणून पाहिले जाते. कोंकणी ही स्वतंत्र भाषा आहे, या मातीचा तो स्वर आहे, ही गोष्ट मराठीवाद्यांनी मान्य करायला हवी. तसेच मराठी ही पूर्वीपासून या प्रदेशात असून नंतर ती सांस्कृतिकदृष्ट्या फुलत गेली, येथील जनतेनेच ती डोक्यावर घेतली, ही वस्तुस्थिती काही कोंकणीवाद्यांनीही मान्य करण्याची गरज आहे. अर्थात अशोक भोसले यांनी कायम कोंकणीची बाजू घेतली, पण मराठीप्रेमींचाही आदर राखला, हे येथे नोंद करावे लागेल.