गोव्याला विक्रमी १ कोटी ८ लाख पर्यटकांची भेट; पर्यटन विभागाकडून आकडेवारी जारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2026 11:03 IST2026-01-11T11:01:08+5:302026-01-11T11:03:50+5:30
विशेष करून कोरोना काळानंतर पर्यटकांनी पुन्हा एकदा पर्यटनस्थळ म्हणून पसंती दिली जात आहे.

गोव्याला विक्रमी १ कोटी ८ लाख पर्यटकांची भेट; पर्यटन विभागाकडून आकडेवारी जारी
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्याने देशातील अग्रगण्य पर्यटनस्थळ म्हणून पुन्हा एकदा आपले स्थान मजबूत केले आहे. २०२५ साली राज्याला एकूण १ कोटी ८ लाख २ हजार ४१० पर्यटकांनी भेट दिली. यात १ कोटी २ लाख ८४ हजार ६०८ देशी व ५ लाख १७ हजार ८०२ विदेशी पर्यटकांचा समावेश आहे.
पर्यटन खात्याने ही आकडेवारी जारी केली आहे. विशेष करून कोरोना काळानंतर पर्यटकांनी पुन्हा एकदा पर्यटनस्थळ म्हणून पसंती दिली जात आहे. २०२०, २०२१ व २०२२ या वर्षात पर्यटकांची संख्या बरीच घटली होती. २०२३ पासून पर्यटकांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दाबोळी व मोपा विमानतळावर आलेल्या चार्टर विमानांतूनही पर्यटक मोठ्या संख्येने गोव्यात दाखल झाले आहेत.
पर्यटन संचालक केदार नाईक म्हणाले, 'गोव्यात येणाऱ्या देशी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. दाबोळी व मोपा विमानतळांवरील वाढती आंतरराष्ट्रीय वाहतूक आणि क्रूझ पर्यटनाचे योगदान, पायाभूत सुविधा, पर्यटन व्यवस्थापनातील एकत्रित प्रयत्नांना आलेले यश आहे.'
वर्षनिहाय आकडेवारीवरून गोव्यातील पर्यटन क्षेत्राची ताकद व नियोजनबद्ध प्रयत्नांचे यश आल्याचे दिसून येते. चार्टर, क्रुझ व आंतरराष्ट्रीय उड्डाणांमधून गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. यात मोपा विमानतळाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी नमूद केले.
आकडेवारी पर्यटकांची
| वर्ष | पर्यटकांची एकूण संख्या |
| २०१७ | ७७ लाख ८५ हजार ६९३ |
| २०१८ | ८० लाख १५ हजार ४०० |
| २०१९ | ८० लाख ६४ हजार ४०० |
| २०२३ | ८६ लाख २८ हजार १६२ |
| २०२४ | १ कोटी ४ लाख ९ हजार १९६ |
क्रुझद्वारे आलेले पर्यटक
| वर्ष | क्रुझ संख्या | पर्यटक संख्या |
| २०२२ | ५ | १२ हजार ८५६ |
| २०२३ | ५२ | ५८ हजार ६०३ |
| २०२४ | ५० | ६६ हजार ५५५ |
| २०२५ | ३७ | ५१ हजार ५१० |
चार्टर विमानाद्वारे आलेले पर्यटक
| वर्ष | चार्टर विमाने | पर्यटक संख्या | विमानतळ |
| २०१७ | १०२४ | २ लाख ४९ हजार ३७४ | दाबोळी |
| २०१९ | ७९९ | २ लाख १६ हजार ७३८ | दाबोळी |
| २०२३ | ३५६ | ७२ हजार ७९५ | मोपा |
| २०२४ | २६६ | ५८ हजार ६८० | मोपा |
| २०२५ | १८९ | ४० हजार ३३६ | मोपा |