तीन वर्षांत दहा आमदारांच्या 'आरोग्या'वर ७१ लाख खर्च
By किशोर कुबल | Updated: November 24, 2025 12:20 IST2025-11-24T12:20:16+5:302025-11-24T12:20:16+5:30
सिक्वेरा यांचे सर्वाधिक ४३ लाख ४७ हजाराचे बिल

तीन वर्षांत दहा आमदारांच्या 'आरोग्या'वर ७१ लाख खर्च
किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या तीन वर्षांच्या काळात दहा आमदारांच्या आरोग्यावर सरकारी तिजोरीतून तब्बल ७१ लाख ६ हजार ७११ रुपये खर्च झाले आहेत. काही आमदारांनी आपले आजारी आई, वडील किंवा पत्नीच्या वैद्यकीय उपचारांसाठीही हा लाभ घेतला आहे. वैद्यकीय बिले सादर केल्यानंतर या रकमेचा परतावा आमदारांना मिळालेला आहे.
याबाबत विधिमंडळ खात्याकडून आरटीआय अर्जाला मिळालेल्या माहितीनुसार २०२२ पासून वैद्यकीय उपचारांसाठी सर्वाधिक ४३ लाख ९७हजार ५७३ रुपये खर्च आमदार आलेक्स सिक्वेरा यांच्यावर झालेला आहे. सिक्वेरा मंत्री असताना मध्यंतरी बरेच दिवस आजारी होते. दिल्लीतील रुग्णालयात उपचारांसाठी त्यांना दाखल केले होते. विधानसभा अधिवेशनाला काही दिवस असताना ते डिसचार्ज घेऊन गोव्यात परतले.
सिक्वेरा यांच्या पत्नीच्या उपचारांवर ३ लाख २ हजार ९९२ रुपये खर्च झाला आहे. बांधकाममंत्री दिगंबर कामत यांनी या कालावधीत आमदार असताना पत्नीच्या उपचारांवर ६ लाख ८१ हजार ३७९ रुपये तर स्वतःच्या वैद्यकीय उपचारांसाठी १ लाख ५५ हजार ४४८ रुपये लाभ घेतला आहे.
आमदार केदार नाईक यांनी आपल्या मातेच्या वैद्यकीय उपचारांसाठी सरकारी तिजोरीतून १० लाख ११ हजार ३६५ रुपये वैद्यकीय खर्चाचा लाभ घेतला आहे. आमदार विजय सरदेसाई यांनी आपल्या वडिलांच्या उपचारांसाठी ३ लाख ५५ हजार १४८ रुपयांचा लाभ घेतला आहे.
मंत्र्यांच्या वेतन, भत्त्यांवर ३ कोटी ७२ लाख खर्च
आरटीआय माहितीतून असेही स्पष्ट झाले आहे की, सर्व बाराही मंत्र्यांचे वेतन व भत्ते मिळून वर्षाकाठी तब्बल ३ कोटी ७१ लाख २५ हजार २०० रुपये तिजोरीतून बाहेर काढावे लागतात. दरमहा प्रत्येक मंत्र्याला २ लाख ५८ हजार ३०० रुपये मिळतात. शिवाय कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा खर्च वेगळा आहे.
कुटुंबीयांचा वैद्यकीय खर्च
कला व संस्कृती मंत्री रमेश तवडकर यांनी पत्नीच्या आरोग्य खर्चावर ८,३२० रुपये, आमदार वीरेश बोरकर यांनी आपल्या मातेच्या वैद्यकीय उपचारांवर ७,१०० रुपये, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी स्वतःच्या वैद्यकीय खर्चावर १५,०१६ रुपये, हळदोणेचे आमदार कार्ल्स फेरेरा यांनी पत्नीच्या वैद्यकीय खर्चावर १,६१० रुपये व कुठ्ठाळीचे अपक्ष आमदार आंतोन वास यांनी आपल्या मातेच्या वैद्यकीय खर्चावर १८,२१६ रुपये खर्चाचा लाभ सरकारी तिजोरीतून घेतला आहे.
सर्वाधिक पेन्शन २ लाख
शिवाय दरमहा ८० माजी आमदारांना पेन्शन दिली जाते. सर्वाधिक २ लाख रुपये पेन्शन मिळणाऱ्यांमध्ये प्रतापसिंह राणे, रमाकांत खलप, लुईझिन फालेरो, बाबू कवळेकर, बाबू आजगावकर, पांडुरंग मडकईकर, फिलीप नेरी रॉड्रिग्स, चर्चिल आलेमाव, फ्रान्सिस सार्दिन, लक्ष्मीकांत पार्सेकर, दयानंद मांद्रेकर, चंद्रकांत चोडणकर आदीचा समावेश आहे. तर एकदाच आमदार बनलेले प्रसाद गावकर, प्रवीण झाट्ये, दीपक पाऊसकर वगैरेंना सरकारच्यावतीने दरमहा १ लाख २९ हजार २६० रुपये पेन्शन मिळते.