सुलेमानच्या मागावर होते ७० पोलिस! डीजीपी आलोक कुमार यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2024 08:50 IST2024-12-24T08:49:30+5:302024-12-24T08:50:18+5:30

अट्टल गुन्हेगार सुलेमानवर देशभरात गुन्हे नोंद आहेत.

70 policemen were on the trail of suleman khan information from dgp alok kumar | सुलेमानच्या मागावर होते ७० पोलिस! डीजीपी आलोक कुमार यांची माहिती

सुलेमानच्या मागावर होते ७० पोलिस! डीजीपी आलोक कुमार यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: फरार सुलेमानला पुन्हा पकडण्यासाठी सरकारसह पोलिसांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यासाठी विविध पथके स्थापन करून ती सुलेमानच्या मागावर होती. या पथकांमध्ये जवळपास ७० पोलिस होते, अशी माहिती पोलिस महासंचालक आलोक कुमार यांनी सोमवारी दिली.

अट्टल गुन्हेगार सुलेमानवर देशभरात गुन्हे नोंद आहेत. पलायनानंतर तो पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करील याची पोलिसांना कल्पना होती. तो वारंवार आपले ठिकाण बदलत असल्याचेही पोलिसांना आढळून आले. फरार काळात तो मंगळूर, कारवार, मुंबई, हुबळी, कोची, एर्नाकुलम या ठिकाणी वावरत राहिला. त्यामुळे पोलिसही आपली रणनीती बदलत राहिले. शेवटी एक अत्यंत महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली ती म्हणजे सुलेमानला त्याच्या कुटुंबीयांनीच आश्रय दिला आहे. त्याची घरे अनेक ठिकाणी आहेत, परंतु त्याचे अधिकतर कुटुंबीय केरळमध्ये एर्नाकुलम येथे आहेत, अशी माहिती मिळाली.

त्यामुळे लगेच त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पथक पाठविण्यात आले आणि केरळ पोलिसांच्या मदतीने एर्नाकुलम येथील त्याच्या कुटुंबीयाच्या घरावर छापा टाकण्यात आला. तिथे सुलेमान व त्याची पत्नी अफसाना ऊर्फ सारिकाही सापडली. दोघांनाही अटक करण्यात आली आहे. सुलेमानला जुने गोवा पोलिसांच्या कोठडीत तर अफसानाला म्हापसा पोलिसांच्या कोठडीत ठेवण्यात आले आहे.

व्हिडीओ महागात पडला 

फरार झाल्यानंतर सुलेमानने पहिला व्हिडीओ बनवून व्हायरल केला आणि नेमका हाच व्हिडीओ त्याला पकडून देण्यास कारणीभूत ठरला. व्हिडीओतील लोकेशन पोलिसांनी टिपले. तोच धागा पकडून त्याच्या शोधासाठी पुढचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ९ दिवसांच्या आत पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले.

हजरत बावन्न्चार जामिनावर सुटला 

पणजी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयाने हजरत बावन्नवार याला सशर्त जामीन मंजूर केला आहे. बावन्नवार याला सुलेमानला तुरुंगातून पळून जाण्यासाठी मदत केल्याप्रकरणात अटक केली होती. त्याने केलेल्या जामीन अर्जावर काल सुनावणी होऊन न्यायालयाने त्याला सशर्त जामीन मंजूर केला. ३० हजार रुपयांची वैयक्तिक हमी आणि पोलिसांना तपास करण्यास सहकार्य या अटीवर त्याला जामीन देण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वीच झाली केरळमध्ये अटक

भू-बळकाव आणि इतर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला सराईत गुन्हेगार सिद्दीकी ऊर्फ सुलेमान याला दोन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. कालच पोलिसांचे पथक त्याला गोव्यात घेऊन आले असून आता चौकशीत तो पलायनानंतर कोणा- कोणाच्या संपर्कात होता हे समोर येईल, असेही ते म्हणाले.

मडगाव येथे सोमवारी पश्चिम बगलरस्ता प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मी लोकांना यापूर्वी सांगितले होते की तुम्ही गोवा पोलिस आणि सरकारवर विश्वास ठेवा. जे काही लोक सुलेमानचे फोटो घेऊन फिरत होते त्यांना सुलेमानवर गुन्हे दाखल झाल्यावर पोलिसांच्या ताकदीची प्रचिती आली आहे. गोव्यातच नव्हे तर सुलेमानवर पुणे, दिल्ली आणि इतर राज्यांत अनेक गुन्हे दाखल आहेत. केरळ येथे जाऊन गोवा पोलिसांनी त्याला गोव्यात आणल्याचेही त्यांनी सांगितले.

सुलेमानच्या पलायनानंतर काही राजकीय पक्षांनी या विषयाचा कसा फायदा उठवायचा प्रयत्न केला हे गोमंतकीयांनी पाहिले आहे. पण, माझे सरकार भू-बळकावमधील एका ही व्यक्तीला सोडणार नाही, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

पार्श्वभूमी...

भू-बळकाव प्रकरणातील मुख्य आरोपी सुलेमानला अटक करण्यात आली होती. ४ राज्यांत त्याच्यावर पंधराहून अधिक गुन्हे नोंद असून खून, मारामाऱ्या, बनावट कागदपत्रांच्या साहाय्याने जमीन हडप करणे, खंडणी गोळा करणे अशा स्वरूपाचे गंभीर आरोप आहेत. म्हापसा येथील भू- बळकाव प्रकरणात गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिस कोठडीत असताना तिथून तो १३ डिसेंबर रोजी मध्यरात्री आयआरबीचा पोलिस कॉन्स्टेबल अमित नाईक याच्या मदतीने पळाला होता. या प्रकरणात कॉन्स्टेबल नाईक याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.

Web Title: 70 policemen were on the trail of suleman khan information from dgp alok kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.