अवयव रोपणानंतरची एका जिद्दी अवलियाची गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 09:50 IST2025-08-15T09:49:51+5:302025-08-15T09:50:06+5:30
५६ वर्षीय तरुण उमेश ढवळीकर जर्मनीत होणाऱ्या प्रत्यारोपण ऑलिंपिक स्पर्धेत (Transplant olympics game) सहभागी होतोय. त्यानिमित्त...

अवयव रोपणानंतरची एका जिद्दी अवलियाची गोष्ट
डॉ. विनय लक्ष्मण बापट, गोवा विद्यापीठ
'माझ्या बुटांच्या चारी जोड्या व्यवस्थित पॅक केल्यास ना?' उमेश आपल्या सहचारिणीला विचारत होता. 'सगळं व्यवस्थित पॅक केलंय, तुम्ही फक्त जोरात पळायचं बघा...' ती हसून उत्तर देत म्हणाली. ही मी लिहीत असलेल्या कोणत्याही कथेची सुरुवात नाही. तर एक वास्तव आहे. आपला ५६ वर्षीय गोमंतकीय तरुण उमेश ढवळीकर जर्मनीमधील ड्रेस्डेन येथे रविवारी १७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या प्रत्यारोपण ऑलिंपिक स्पर्धेत (Transplant olympics game) सहभागी होण्यासाठी आज १५ ऑगस्ट रोजी गोव्याहून निघाला आहे. भारतातून सत्तावन्न खेळाडूंचे पथक यात भाग घेत असून त्यातील अॅथलेटिक्स संघाचे नेतृत्व उमेश ढवळीकर करणार आहे. पण हा प्रवास खूप खडतर होता. कारण उमेश साक्षात मृत्यूशी हस्तांदोलन करून परत आला आहे.
१४ एप्रिल २०१५ रोजी बंगळुरुच्या बीजीएस ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दोन शस्त्रक्रिया सुरू होत्या. संगीताच्या यकृताचा एक लहान तुकडा काढला जात होता, त्याचवेळी उमेशच्या यकृताचा खराब झालेला भाग काढून त्या ठिकाणी संगीताच्या यकृताचा काढलेला भाग प्रत्यारोपित करण्याची शस्त्रक्रिया सुरू होती. एक ऑपरेशन ९ तास तर दुसरे ऑपरेशन तब्बल ११ तास चालले. बहिणीने आपल्या भावाला अनोखी भेट दिली होती. त्याला नवे आयुष्य दिले होते. तोच उमेश आज ड्रेस्डेन येथे होणाऱ्या प्रत्यारोपण ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होत आहे.
हा प्रवास आश्चर्यकारक तर आहेच, पण सर्वांसाठी तेवढाच प्रेरणादायीदेखील आहे. उमेशच्या संपूर्ण प्रवासाविषयी त्याची आई सुमंगला नारायण ढवळीकर यांनी लिहिलेले आणि संचित प्रकाशनने प्रकाशित केलेले 'पुनर्जन्म एका जीवनदानाची सत्यकथा' हे पुस्तक तेवढंच वाचनीय व प्रेरणादायी आहे. उमेशला २०१५ मध्ये Fulminant hepatic failure या अत्यंत दुर्मिळ आजाराची लागण झाली. अगदी दोन-तीन दिवसात त्याच्या यकृतानं काम करणंच जवळपास बंद केलं. त्याला तातडीनं बंगळुरुच्या 'बीजीएस ग्लोबल हॉस्पिटल'मध्ये अॅडमिट करण्यात आलं. तेथील डॉक्टरांनी फक्त चार दिवसांची मुदत दिली. त्या चार दिवसांत लिव्हर ट्रान्सप्लांट होणं आवश्यक होतं.
अशावेळी त्याची बहीण पुढे आली. तिने आपल्या यकृताचा काही भाग दान केला आणि आपल्या भावाचे प्राण वाचवले. पण या पुढील प्रवास अजिबात सुकर नव्हता. पाच-सहा महिने खूप काळजी घ्यावी लागली. संगीताची तब्येत दोन-तीन महिन्यांत पूर्वपदावर आली. ती आपली सर्व कामं करू लागली. आज तीदेखील मॅरेथॉनमध्ये भाग घेते, दूरवर सायकल प्रवास करते. उमेशला चालण्या-पळण्याची, गिर्यारोहणाची आधीपासूनच आवड असल्यामुळे ऑपरेशन नंतर खचून न जाता वर्षाच्या आतच दहा किलोमीटर मॅरेथॉनमध्ये भाग घेण्याइतकी तंदुरुस्ती त्याने प्राप्त केली.
भारतात अवयवदानाविषयी जागृती वाढत आहे, परंतु ती अजून समाधानकारक म्हणावी अशी नाही. राष्ट्रीय अवयव तसेच ऊती प्रत्यारोपण संघटन (National Organ and Tissue Transplant Organization) च्या अहवालानुसार २०१३ मध्ये भारतात फक्त ८३७ अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर २०२३ मध्ये हे प्रमाण २९३५ इतकं वाढलं. पण गरज त्यापेक्षा खूप मोठी आहे. आज भारतात दहा लाखांपेक्षा जास्त लोक अवयवदान मिळविण्याच्या प्रतिक्षेत आहेत. दररोज किमान १५ जणांचा मृत्यू अवयवदान न मिळाल्याने होतो.
अवयवदानाबद्दलचे गैरसमज, जागृकता नसणे व अनास्था यामुळे लोक मृत्यूनंतरदेखील अवयवदान करीत नाहीत. विशेषतः 'ब्रेन डेड' व्यक्ती अवयवदान करून अनेक लोकांचे आयुष्य वाचवू शकते. परंतु अशा पेशंटचे नातेवाईक अवयवदानासाठी तयार होत नाहीत. ही आपल्याकडील शोकांतिका आहे. याविषयी उमेशला अवयवदान केलेली बहीण संगीता हिने पुस्तकात तिच्या मनोगतात जे लिहिलं आहे ते प्रत्येकाने वाचावं असं आहे. ती म्हणते, 'मरावे परी कीर्तिरुपे उरावे' अशी एक म्हण आहे, पण मी तर म्हणेन 'मरावे परी अवयवरुपी उरावे!' आपण जिवंतपणी काही अवयवांचे दान करू शकतो, तसेच मृत्यूनंतरही आपले अवयव दानासाठी उपयुक्त असतात. हे वास्तव आजच्या आधुनिक काळात लक्षात घेतले पाहिजे.
इथे मला एक गोष्ट मुद्दाम नमूद कराविशी वाटते ती म्हणजे, जिवंतपणी अवयवदान करणाऱ्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिलांची संख्या जवळपास दुप्पट आहे. उमेश ट्रान्सप्लांट ऑलिंपिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पाच क्रीडाप्रकारांत सहभाग घेणार आहे. त्यात १०० मी. धावणे, पाच किलोमीटर जलद चालणे यात तो सहभागी होणार आहे. खरेतर तो २०० मीटर धावण्यातदेखील तो भाग घेणार होता, परंतु काही स्पर्धाच्या वेळा एकच असल्यामुळे त्याला भाग घेता आला नाही. चंदीगड येथे झालेल्या राष्ट्रीय ट्रान्सप्लांट स्पर्धेत भाग घेऊन त्याने सुवर्णपदके जिंकली आहेत. त्या आधी मुंबईत झालेल्या स्पर्धेतदेखील पदकांची कमाई केली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत त्याच्या बहिणीने संगीतानेदेखील सहभाग घेतला होता.
ट्रान्सप्लांट गेम या ज्यांनी अवयवदान स्वीकारले आहे, आणि ज्यांनी अवयवदान केले आहे त्या दोहोंसाठी व त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसाठी खुल्या असतात. अर्थात प्रत्येकाची विभागणी वेगवेगळी असते. या सर्व स्पर्धात सहभागी व्हायचा खर्च स्पर्धकांना स्वतः करावा लागतो, त्यामुळे तसे खर्चिक असते. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जी तयारी करावी लागते त्यासाठीसुद्धा बराच खर्च येतो. अजून या स्पर्धाबद्दल जनजागृती झाली नसल्याने खासगी प्रायोजकही मिळत नाहीत. पण आनंदाची गोष्ट म्हणजे, या स्पर्धेबद्दल व उमेश त्यात सहभागी होत आहे हे समजल्यानंतर आपले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मदतीचा हात पुढे केला. त्याच्या खर्चासाठी तीन लाख रुपये निधी मंजूर केला.
अवयवदान स्वीकारल्यानंतर व अवयवदान केल्यानंतर माणूस निरोगी जीवन जगू शकतो. खेळ माणसाच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यात मोठी भूमिका बजावतात, हे सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हाच या स्पर्धेत सहभागी होण्याचा मुख्य उद्देश असल्याचे उमेश सांगतो. मी व माझी अवयवदान करणारी बहीण आम्ही दोघंही एवढे तंदुरुस्त आहोत ही गोष्ट निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. त्यामुळे अनेकजण अवयवदानासाठी उद्युक्त होत आहेत.
अवयवदान घेणाराही आजाराने खचून न जाता, मी पूर्ण बरा होईन हा आत्मविश्वास मनात बाळगतो. हा आत्मविश्वासच सर्वांत महत्त्वाचा असतो, असे उमेश म्हणतो. २०२७ मध्ये बेल्जियम येथे होणाऱ्या पुढील ट्रान्सप्लांट ऑलिंपिकमध्ये गोव्यातील दहा जणांचे पथक घेऊन जाण्याची मनिषा उमेश ढवळीकर यांनी बाळगली आहे. खरोखरच त्याच्या सकारात्मकतेला सलाम. त्याला खूप खूप शुभेच्छा. तो आणि त्याचे पथक निश्चितच जर्मनीतून पदकांची लयलूट करून येईल, अशी आशा बाळगूया.