करवाटपातून गोव्याला ५,५७० कोटी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; अर्थसंकल्पाचा होणार मोठा लाभ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 10:08 IST2026-02-03T10:08:00+5:302026-02-03T10:08:31+5:30
पायाभूत सुविधा विकास निधीतून गोव्याला निधी मिळणार आहे.

करवाटपातून गोव्याला ५,५७० कोटी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत; अर्थसंकल्पाचा होणार मोठा लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : केंद्रीय अर्थसंकल्पातून गोव्यात पर्यटन, शेती व शिक्षणासह विविध लाभघटकांना होईल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी मंत्री माविन गुदिन्हो, मंत्री सुभाष शिरोडकर, मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, वित्त खात्याचे संयुक्त सचिव (बजेट) प्रणव भट उपस्थित होते. अर्थसंकल्पात पर्यटन सुविधा, मत्स्य प्रक्रिया व शीतगृहे, विविध उद्योगांसाठी वित्तपुरवठा व शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता वाढविण्यावर विशेष भर दिला आहे.' हा अर्थसंकल्प गोव्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा असून रोजगारनिर्मिती, उत्पन्नवाढ आणि राज्याच्या आर्थिक स्थैर्यास बळकटी देईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री म्हणाले की, 'गोव्यातील खाजन शेती पुनरुज्जीवनासाठीही केंद्र सरकारने गोव्याच्या मागणीची सकारात्मक दखल घेतली आहे. हवामान सहिष्णू पायाभूत सुविधा उभारणी तसेच आपत्ती प्रतिबंधासाठी विशेष साहाय्य मिळावे यासाठी जलस्रोत खात्याने सादर केलेले प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहेत. याशिवाय वनाग्नी प्रतिबंधासाठी वन खात्याचे आणि आपत्ती व्यवस्थापन व नुकसानभरपाईसाठी महसूल विभागाचे प्रस्तावही मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहेत. केंद्र सरकारकडून या प्रस्तावांना मान्यता मिळाल्यास गोव्यातील शेती, पर्यावरण संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळेल.'
मुख्यमंत्री म्हणाले की, 'पायाभूत सुविधा विकास निधीतून गोव्याला निधी मिळणार आहे. नव्यानेच निर्मिती झालेल्या कुशावती या तिसऱ्या जिल्ह्यासाठी ५० वर्षाच्या व्याजमुक्त कर्जाच्या योजनेद्वारे ५०० कोटी रुपये निधी उपलब्ध होईल. सरकारने तशी मागणी याआधीच केलेली आहे. कुशावती जिल्ह्यात मोठी विकासक्षमता आहे. हा निधी पायाभूत सुविधांसाठी प्रभावीपणे वापरता येईल. २४,४४४ कोटी रु. पंधराव्या वित्त आयोगाच्या २०२०-२१ ते २०२५-२६ या पाच वर्षांच्या कालावधीत कालावधीत करवाटपातून मिळाले.