पणजीत विना मास्क फिरणाऱ्या ५० पर्यटकांना दंड; महापालिकेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 15:20 IST2020-11-21T15:20:04+5:302020-11-21T15:20:31+5:30
CoronaVirus News : मास्क न घातलेल्या प्रत्येकाकडून शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला. याआधीही महापालिकेने अशीच कारवाई केली होती.

पणजीत विना मास्क फिरणाऱ्या ५० पर्यटकांना दंड; महापालिकेची कारवाई
पणजी : येथील चर्च परिसरात विना मास्क फिरणाऱ्या सुमारे ५० पर्यटकांना महापालिकेच्या निरीक्षकांनी महापौर उदय मडकईकर यांच्या उपस्थितीत दंड ठोठावला. ज्यांच्याकडे मास्क नव्हते अशा पर्यटकांना महापालिकेने मोफत मास्कही वाटले.
मास्क न घातलेल्या प्रत्येकाकडून शंभर रुपये दंड वसूल करण्यात आला. याआधीही महापालिकेने अशीच कारवाई केली होती. विकेंडला गोव्याच्या पर्यटनस्थळांवर देशी पाहुण्यांची गर्दी वाढू लागली आहे. राजधानी शहरातील मॅरी इम्यॅक्युलेट चर्चला अनेक पर्यटक रोज भेट देत असतात. चर्चच्यासमोर असलेल्या पायऱ्यांवर पर्यटक बसतात.
महापौर मडकईकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅसिनोंमध्ये येणारे अनेक पर्यटकही मास्कचा वापर करीत नसल्याचे आढळून आले असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. महापौरांनी स्वतःच्या खर्चातून ५०० मास्क खरेदी केले असून ज्यांच्याकडे मास्क नाहीत, त्यांना ते वाटले जातात.