आक्रोश अन् धावपळ! शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत ५ जण गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2025 09:26 IST2025-05-04T09:25:56+5:302025-05-04T09:26:48+5:30

गोमेकॉत १५ जणांवर उपचार

5 people critical in stampede at lairai jatrotsav in shirgaon goa | आक्रोश अन् धावपळ! शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत ५ जण गंभीर

आक्रोश अन् धावपळ! शिरगाव येथील लईराई जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत ५ जण गंभीर

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीत सुमारे सहा जणांना आपला जीव गमावावा लागला आहे, तर जवळपास ५० जण जखमी झाले असून, त्यांच्यावर गोवा वैद्यकीय महाविद्यालय, म्हापसा येथील जिल्हा हॉस्पिटल आणि डिचोली येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे.

जत्रेत पहाटे ३:३० वा.च्या सुमारास चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यावेळी उपस्थित पोलिसांच्या मदतीने जखमींना त्वरित डिचोली आरोग्य केंद्रात नेण्यात आले. पण, नंतर जखमींची संख्या वाढू लागल्याने गंभीर जखर्मीना म्हापसा जिल्हा हॉस्पिटलमध्ये आणि गोमेकॉत पाठविण्यात आले. गोमेकॉत पहाटे ५:३० च्या सुमारास जखमींना आणण्यात आले आहे. एकूण १५ जणांना गोमेकॉत दाखल करण्यात आले होते. त्यातील एकाला घरी पाठविण्यात आले आहे, तर इतर १३ जणांवर उपचार सुरू आहेत. या १३ पैकी ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील काहींना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. काहींच्या प्रकृतीमध्ये सुधारणा दिसत आहे, केवळ दोघे गंभीर आहेत, अशी माहिती समोर आली आहे.

मंत्री, आमदारांकडून जखमींची भेट

चेंगराचेंगरीची माहिती मिळताच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, मंत्री, आमदारांनी रुग्णालयामध्ये पोहोचत जखमींची भेट घेत विचारपूस केली. स. ८:३० च्या सुमारास मुख्यमंत्री सावंत यांनी गोमेकॉला भेट दिली आणि सर्व व्यवस्था जाणून घेतली. त्यांच्या पाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री गोविंद गावडे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, रुडॉल्फ फर्नांडिस, वीरेश बोरकर यांनीदेखील भेट दिली.

आधी भांडण, नंतर चेंगराचेंगरी

लईराई जत्रेत शनिवारी पहाटे ३:३० च्या सुमारास धोंडांच्या दोन गटांमध्ये भांडण झाले होते. याचे रूपांतर चेंगराचेंगरीत झाले. दुर्घटना घडली तेथे उतरता मार्ग असल्याने अनेकांचा तोल जात खाली पडले. अनेकजण जवळच्या दुकानांमध्येदेखील पडले. दुकानांत पडलेल्यांना विजेचा धक्काही लागल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

बंदोबस्तासाठीचे एक हजार पोलिस कुठे ?

शिरगाव येथील लईराई देवीच्या जत्रेवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत काहींनी आपला जीव गमावला. ज्यावेळी ही घटना घडली, त्यावेळी तेथे तैनात १ हजार पोलिस कुठे होते, असा प्रश्न आम आदमी पक्षाचे नेते अॅड. अमित पालेकर यांनी केला आहे. या घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना किमान १ कोटी रुपयांची तात्पुरती मदत व जखमींना १० लाख रुपयांची मदत त्वरित द्यावी. एकूणच या चेंगराचेंगरीच्या घटनेची सरकारने चौकशी करावी, अशी मागणीही त्यांनी केली. अॅड. पालेकर म्हणाले की, या चेंगराचेंगरीच्या घटनेमुळे जीव गमावलेल्या भक्तांच्या मृत्यूने आम आदमी पक्षाला धक्का बसला आहे. सर्व प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार प्रशासनाला गर्दीवर नियंत्रण राखण्यास अपयश आले आहे. 

होमकुंड परिसरात रस्त्यावरच थाटली जातात दुकाने

शिरगावचा जत्रोत्सव प्रसिद्ध असल्यामुळे होमकुंड पाहण्यासाठी लाखों भाविक येत असतात. तसेच धोंडही असतात. पण ही जागा अडचणीची असल्याने येथे गर्दी नियंत्रणात आणताना कठीण होते. या ठिकाणी बाजूलाच रस्त्यावर जत्रोत्सवातील दुकाने थाटली जातात. त्याचप्रमाणे भाविक तसेच धोंडही एकाच अडचणीच्या रस्त्यावर चालतात. त्यातून एकमेकांना धक्काबुक्की करण्याचे प्रकार घडल्याने शनिवारी अशा प्रकारच्या घटनेमुळे अनर्थ घडला. शिरगाव होमकुंड परिसरात वरच्या बाजूला धोंडगण होमकुंडमध्ये जाण्यासाठी येत असतात. चढ़ाव असल्याने एकमेकांचे नियंत्रण जाते. त्याच बाजूने भाविकांची मोठी गर्दीही असते. अशा परिस्थितीत बाजूला रस्त्यावर वेगवेगळी दु‌काने थाटली जातात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली.

जखमींवर आमच्या डॉक्टर्सची टीम लक्ष ठेवून आहे. आवश्यक सर्व उपाययोजना करत आहोत. डिचोली आरोग्य केंद्र आणि म्हापसा जिल्हा हॉस्पिटल यांच्याशीदेखील आम्ही संपर्कात आहोत. गरज असल्यास त्यांना काही सुविधा पुरवू शकतो, तसेच तेथील काहींना गोमेकॉत हलविण्याची गरज असल्यास तेदेखील आम्ही करू. येथे विशेष वॉर्ड तयार केला आहे. - डॉ. राजेश पाटील, वैद्यकीय अधीक्षक

लईराई जत्रा राज्यातील सर्वात मोठी जत्रा, येथे लोखोंच्या संख्येने लोक येत असतात, पण आतापर्यंत अशाप्रकारची घटना कधीच घडली नाही. सदर चेंगराचेंगरीची घटना खुपच वेदनादायी आहे. या घटनेत मुत्यूमुखी पडलेले आणि जखमींच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. याबाबत काही आर्थिक मदत करता मुख्यमंत्र्याशी देखील मी चर्चा करणार आहे. प्रशासनाने यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी काळजी घ्यावी. - रुदोल्फ फर्नाडिस, सांताक्रूझ आमदार

शिरगाव येथील लईराई देवीच्या प्रसिद्ध जत्रोत्सवातील चेंगराचेंगरीत निरपराधांनी जीव गमावला. अनेकजण जखमी झाले. दुर्घटना ही मुख्यमंत्र्यांच्या तालुक्यात घडली. सरकारने सक्रिय पद्धतीने पुढाकार घेतल्यास हा अपघात टाळला जाऊ शकला असता, कारण दरवर्षी भक्तांची संख्या वाढत आहे, विशेषतः धोंड भक्तांची, दरवर्षी ५०० नवीन धोंड येतात. देवी लईराईची जत्रेत केवळ गोव्यातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या राज्यांतील लोकही दर्शनासाठी येतात. त्यादृष्टीने सरकारचे व्यवस्थापन असणे अपेक्षित होते. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी त्रुटींचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी व्हावी. - गिरीश चोडणकर, माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

 

Web Title: 5 people critical in stampede at lairai jatrotsav in shirgaon goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.