२७ मध्ये २७ उमेदवार विजयी करणार; मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 07:57 IST2025-03-24T07:57:42+5:302025-03-24T07:57:51+5:30

देश प्रथम ही भाजपची नीती

27 candidates will win in 2027 goa assembly election said cm pramod sawant | २७ मध्ये २७ उमेदवार विजयी करणार; मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

२७ मध्ये २७ उमेदवार विजयी करणार; मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : 'काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या राजवटीत कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. भाजप सरकारने १४ वर्षांत तो विकास करताना प्रत्येक घरात समृद्धी आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देश प्रथम ही भाजपची नीती आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आपले गाव, राज्य, देश मजबूतीसाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत २७ उमेदवार निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे. डिचोली मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार विजयी करू असा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा,' असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

डिचोली येथील दीनदयाळ भावनात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रदेश सचिव सिद्धार्थ कुंकळ्येकर, दयानंद कारबोटकर, अध्यक्ष डॉ. कौस्तुभपाटणेकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, वल्लभ साळकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, प्रदीप रेवोडकर, विश्वास गावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल डिचोली भाजप मंडळ समितीतर्फे दामू नाईक यांचा मोठा गुलाबपुष्पांचा हार घालून मुख्यमंत्री सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दामू नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना संघटना व पक्ष मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान लाभत असल्याचे सांगितले. आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांनी संघटन मजबूत करण्यासाठी संघटित काम करू. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री सावंत यांच्या कार्याने प्रभावित होऊन भाजपला पहिल्या दिवसापासून पूर्ण पाठिंबा दिला आहे असे सांगितले.

गेल्या तीन वर्षांत चौफेर विकास साधला आहे. डिचोलीत भव्य शासकीय संकुल, कला भवनसाठी ऐंशी कोटी मंजूर झाले आहेत. लवकरच पायाभरणी होईल. तसेच क्रीडा संकुल व इतर योजना राबवणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी स्वागत केले. संजय म्हापसेकर यांनी सूत्रसंचालन केले.

प्रशासकीय इमारतीसाठी ८० कोटी

मुख्यमंत्री सावंत यांनी संघटन कसे मजबूत करावे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास करणे हा आमचा संकल्प आहे आणि त्या हेतूनेच डिचोली मतदारसंघात अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. लवकरच ८० कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारतीची पायाभरणी करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रात विकासाची द्वारे खुली करून जनतेला अपेक्षित विकास साधण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

शेटयेंना थोडे स्लो राहाण्याचा सल्ला

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. डिचोलीत विकासकामाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आलेली आहे. शेट्ये हे विकासाबाबत फास्ट ट्रॅकवर आहेत. त्यांना आपण थोडे स्लो राहा असा सल्ला दिला आहे.' याशिवाय, मागील निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप उमेदवार विजयी झाला नाही याची खंत आहेच असे सांगून सावंत म्हणाले की, 'पण यापुढे सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र राहावे. कार्यकर्ता दुर्लक्षित होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.'

जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच काम

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जुन्या व नव्यांना बरोबर घेऊन भाजप संघटना मजबूत करून आगामी निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी अविश्रांत कार्य करावे असे सांगितले. ते म्हणाले, कार्यकर्ते ही आमची शक्त्ती आहे. देश प्रथम ही भाजपची संकल्पना आहे. देशहितासाठी सर्वांनी संघटित राहण्याची गरज आहे.

भाजप मजबूत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली २०२७ मध्ये सत्तावीस उमेदवार विजयी करण्याचा संकल्प पूर्ण करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठे योगदान दिले आहे.

'भाजप पक्ष मजबूत करण्यात मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आदींनी सुरुवातीला मोठे योगदान दिले. एकेकाळी भाजीपाव पार्टी अशी अवहेलना झेलली. मात्र आज पक्ष मोठा झाल्याने अनेक पक्षांतील नेते मी येऊ, मी येऊ असे म्हणत मागे लागत आहेत.

 

Web Title: 27 candidates will win in 2027 goa assembly election said cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.