'२०२७'ची विधानसभा मगो-भाजप एकत्र लढणार!: सुदिन ढवळीकर; २०२२ मध्येच युतीचे समीकरण ठरले होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2025 09:21 IST2025-01-08T09:20:12+5:302025-01-08T09:21:21+5:30
जिथे मगो पक्षाचे खरोखरच काम आहे, त्याच जागा आम्ही मागू.

'२०२७'ची विधानसभा मगो-भाजप एकत्र लढणार!: सुदिन ढवळीकर; २०२२ मध्येच युतीचे समीकरण ठरले होते
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ ची विधानसभा निवडणूक मगोप व भाजप युतीनेच लढणार असल्याचे स्पष्ट आहे. २०२२ च्या निवडणुकीनंतर भाजप सरकारला पाठिंबा देतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे आम्ही हे स्पष्ट केलेले आहे. २०२७ मध्येही आम्ही भाजपसोबतच असणार आहोत, असे मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.
युती झाली तर जागा वाटपांबाबत कसा काय समझोता होणार? असा प्रश्न सुदिन यांना केला असता ते म्हणाले की, जेव्हा निवडणूक जाहीर होते तेव्हा जागा वाटपाबाबत काय ते पाहू. आम्ही उगाच हा मतदारसंघ आम्हाला द्या किंवा तो मतदारसंघ आम्हाला द्या, अशी अवास्तव मागणी करणार नाही. जिथे मगो पक्षाचे खरोखरच काम आहे, त्याच जागा आम्ही मागू.
मगो पक्षाचे काम थंडावले आहे, असे वाटत नाही का? या प्रश्नावर ढवळीकर म्हणाले की, असे म्हणता येणार नाही. निवडणुकीला अजून दोन वर्षे आहेत. या काळात आम्ही आमच्या संघटनात्मक कामाला आणखी गती देणार आहोत. मांद्रेचे मगोपचे आमदार जीत आरोलकर हे मगोपसोबत राहतील का? असा प्रश्न विचारला असता सुदिन ढवळीकर म्हणाले की, जीत मगोपसोबतच आहेत. त्यांच्यासमोर ज्या काही अडचणी होत्या त्या आता दूर झालेल्या आहेत. त्यांच्या उर्वरीत अडचणीही दूर होतील.
संघर्षावर ढवळीकर बंधूकडून अखेर पडदा
फोंडा व मडकई मतदारसंघांमध्ये मगो व भाजपमधील संघर्षावरून २०२७ च्या निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र राहतात का? असा प्रश्न गेल्या पंधरवड्यात उपस्थित झाला होता. सुदिन ढवळीकर हे मंत्री असूनही मडकई मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांची कामे करत नाहीत, शिवाय मडकईत भाजपला जास्त सदस्य मिळत नाहीत अशी तक्रार आल्यावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुदिन तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष व कोअर कमिटीतील नेत्यांना बोलावून आमने सामने बैठक घेतली होती.
त्यानंतर असा कोणताही संघर्ष नसल्याचा दावा उभय पक्षांच्या • नेत्यांकडून केला जात होता. तरीही कुठेतरी आग धुमसत असल्याने मगो-भाजपचे संबंध २०२७ च्या निवडणुकीत कायम राहतील का, अशी शंका उपस्थित केली जात होती. मात्र सुदिन यांनी २०२७ मध्येही मगोप भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केल्याने व त्यानंतर पक्षाध्यक्ष या नात्याने दीपक ढवळीकर यांनीही त्यास दुजोरा दिल्याने दोन्ही पक्ष आगामी विधानसभा निवडणूक युतीनेच लढतील, हे अधोरेखित झाले आहे.
केंद्रीय समिती निर्णय घेईल : दीपक ढवळीकर
मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्याशी 'लोकमत'ने संपर्क साधला असता ते म्हणाले की, भाजप आमचा समविचारी पक्ष आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही भाजपसोबत राहू, असे आम्ही यापूर्वीही सांगितले आहे. पक्षाच्या केंद्रीय समितीने यावर निर्णय घ्यावा लागेल. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल.
गेल्यावेळी १३ जागा लढवल्या
फेब्रुवारी २०२२ ची विधानसभा निवडणूक मगोपने तृणमूल काँग्रेसशी युती करून लढवली होती. ४० पैकी १३ जागा मगोपने तर २६ जागा तृणमूलने लढवल्या होत्या. मगोपचे सुदिन ढवळीकर व जीत आरोलकर हे दोघेच निवडून आले. नंतर मगोपने सावंत यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारला पाठिंबा दिला.