12th Exams : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 11:05 PM2021-06-02T23:05:59+5:302021-06-02T23:07:30+5:30

Coronavirus Exam Cancelled : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय. ठरलेल्या निकषानुसार निर्णय घेणार.

12th standard exams canceled in Goa due to coronavirus Announced by Chief Minister Pramod Sawant | 12th Exams : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

प्रातिनिधीक छायाचित्र

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय.ठरलेल्या निकषानुसार निर्णय घेणार.

पणजी : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्री केली. "कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. ठरलेल्या निकषानुसार निकाल जाहीर केला जाईल," असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, शिक्षण सचिव, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण खात्याचे संचालक, उच्च शिक्षण खात्याचे संचालक यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने गोव्यातही बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी ही महत्त्वाची बोलावली बैठक होती.
राज्य सरकार सीबीएसई तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्याही संपर्कात होते. इतर राज्यांच्या शालांत व उच्च माध्यमिक मंडळांनी बारावीबाबत काय निर्णय घेतला आहे हे तपासून पाहिले आणि सायंकाळी उशिरा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. गेले काही दिवस शिक्षणतज्ज्ञ, शाळा प्रमुख, पालक- शिक्षक संघटना तसेच इतर संबंधित घटकांशी सरकार सल्लामसलत करत होते. तीन पर्यायही सरकारच्या विचाराधीन होते. एक तर परीक्षा पूर्णत: रद्द करणे, दुसरा पर्याय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना बसू देणे आणि ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांना अंतर्गत गुणांच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश देणे व दोन्हींचे निकाल एकत्रच जाहीर करणे, असे पर्याय होते. परंतु शेवटी या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
इयत्ता बारावीला कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखांसाठी सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना नीट, जेईई, जीसीईटी आदी परीक्षा देऊन पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावा लागतो. त्यामुळे या परीक्षांच्या बाबतीत केंद्राचा काय निर्णय होतो, याकडे आता विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपचाही विषय येतो. त्यामुळे त्याचे काय करावे, हादेखील एक प्रश्न आहे. सरकार काय उपाय काढते, याकडेही आता लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्राचे नवीन शैक्षणिक धोरण आगामी शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर लागू केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना दिली. 
 शैक्षणिक कृती योजना आणा : कामत
विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे." "तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच विद्यार्थ्यांच्या करिअर, भवितव्याबाबत निर्णय घेतला जावा, असे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत. सरकारने शैक्षणिक कृती योजना आणावी," अशी मागणी कामत यांनी केली आहे.
 

Web Title: 12th standard exams canceled in Goa due to coronavirus Announced by Chief Minister Pramod Sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app