जि.प. कृषी व बांधकाम सभापतीवर अविश्वास दाखल
By Admin | Updated: September 27, 2015 01:00 IST2015-09-27T01:00:25+5:302015-09-27T01:00:25+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेचे बांधकाम, नियोजन सभापती अतुल गण्यारपवार व कृषी व पशुसंवर्धन सभापती...

जि.प. कृषी व बांधकाम सभापतीवर अविश्वास दाखल
१९ सदस्यांनी केल्या स्वाक्षऱ्या :
३८ सदस्य तीर्थाटनावर रवाना झाल्याची चर्चा
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे बांधकाम, नियोजन सभापती अतुल गण्यारपवार व कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार या दोघांविरोधात २४ सप्टेंबर रोजी १९ सदस्यांच्या सहीनिशी अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषदेत पुन्हा अविश्वासाच्या नाट्याचा दुसरा भाग रंगत आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाची एकहाती सत्ता नाही. ५० सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १२, राष्ट्रवादी काँग्रेसचे ९, भाजपचे ९, शिवसेनेचे २, युवाशक्ती आघाडीचे ७, आविसचे तीन, नाग विदर्भ आंदोलन समितीचे चार, तीन अपक्ष असे संख्याबळ आहे. सद्य:स्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रशांत कुत्तरमारे अध्यक्ष तर काँग्रेसचे जीवन नाट उपाध्यक्ष पदावर विराजमान आहे. अपक्ष विश्वास भोवते समाज कल्याण सभापती पदावर असून नाविसच्या सुवर्णा खरवडे महिला बालकल्याण सभापती म्हणून काम पाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आले. परंतु पक्षापासून दूर असलेले अतुल गण्यारपवार बांधकाम सभापती व आविसचे जि.प. सदस्य म्हणून निवडून आलेले अजय कंकडालवार कृषी व पशुसंवर्धन सभापती म्हणून काम पाहत आहे. मागील आठवड्यात अध्यक्ष, उपाध्यक्ष व समाज कल्याण सभापती यांनी स्वत:वर अविश्वास प्रस्ताव दाखल करून घेतला होता. त्यानंतर आता अतुल गण्यारपवार व अजय कंकडालवार यांच्यावर २४ सप्टेंबर रोजी अविश्वास प्रस्ताव जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांच्या नेतृत्वात १९ सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. यामध्ये विविध राजकीय पक्षाचे सदस्य सहभागी असल्याचा दावा राजकीय वर्तुळातून केला जात आहे. अविश्वास प्रस्ताव दाखल होताच ३८ सदस्य तिर्थाटनासाठी रवाना झाले असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेस पक्षही अतुल गण्यारपवार यांच्यावरील अविश्वास प्रस्तावावरून दुभंगलेल्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या अविश्वास प्रस्तावावर नेमकी काय राजकीय घडामोड होते, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. भाजपजवळ नाविसचे संख्याबळ पकडता १५ च्या जवळपास सदस्य जातात. असा दावा भाजपतर्फे करण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय जाणकारांचे याकडे लक्ष आहे. (जिल्हा प्रतिनिधी)