२४ वर्षांत जिल्हा परिषदेला मिळाले १६ अध्यक्ष
By Admin | Updated: February 12, 2017 01:37 IST2017-02-12T01:37:25+5:302017-02-12T01:37:25+5:30
पहिल्या अध्यक्षाचा कार्यकाळ आठ महिने १४ दिवसांचाच राहिला : चार महिलांसह १३ व्यक्तींना मिळाली अध्यक्षपदाची संधी

२४ वर्षांत जिल्हा परिषदेला मिळाले १६ अध्यक्ष
पहिल्या अध्यक्षाचा कार्यकाळ आठ महिने १४ दिवसांचाच राहिला : चार महिलांसह १३ व्यक्तींना मिळाली अध्यक्षपदाची संधी
दिलीप दहेलकर ल्ल गडचिरोली
१९८२ मध्ये गडचिरोली जिल्हा निर्माण झाला. मात्र १९९२ ला जिल्हा परिषद अस्तित्वात आली. गडचिरोली जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान माजी आमदार पेंटाजी रामा तलांडी यांना मिळाला. मागील २४ वर्षांच्या काळात जिल्हा परिषदेला १६ अध्यक्ष लाभले. १३ व्यक्तींनी हे अध्यक्षपद भूषविले.
पेंटाजी रामा तलांडी २१ मार्च १९९२ ला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदावर विराजमान झाले व ४ डिसेंबर १९९२ ला पदावरून पायउतार झाले. तलांडी यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित झाल्याने त्यांना पद सोडावे लागले होते. अवघे पाच महिने ११ दिवस तलांडी यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यानंतर केजूराम दयाराम नैताम यांना अध्यक्ष पदाचा मान मिळाला. केजूराम नैताम हे ५ डिसेंबर १९९२ ते ५ जानेवारी १९९३ अशा एक महिन्याच्या कालावधीसाठी अध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. त्यानंतर बंडोपंत शंकरराव मल्लेलवार तिसरे अध्यक्ष झालेत. ६ जानेवारी १९९३ ते ५ सप्टेंबर १९९६ असा दीर्घ कालावधी मल्लेलवारांनी अध्यक्ष पद सांभाळले. त्यानंतर बी. एम. कुरेशी हे जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून विराजमान झाले. ६ सप्टेंबर १९९६ ते २३ सप्टेंबर १९९६ या कालावधीत ते अध्यक्ष पदाची धुरा सांभाळून होते. पुन्हा बंडोपंत शंकरराव मल्लेलवार अध्यक्ष पदावर आलेत. २४ सप्टेंबर १९९६ ते १५ आॅक्टोबर १९९६ असा अल्प कालावधीत मल्लेलवारांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली. त्यानंतर पुन्हा प्रभारी अध्यक्ष म्हणून बी. एम. कुरेशी यांच्याकडे पदभार आला. १६ आॅक्टोबर १९९६ ते १५ नोव्हेंबर १९९६ असे एक महिन्याचे अध्यक्षपद पुन्हा त्यांनी सांभाळले. त्यानंतर परत पेंटाजी रामा तलांडी यांच्याकडे जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आले. १६ नोव्हेंबर १९९६ ते २० मार्च १९९७ या कालावधीत तलांडी यांनी अध्यक्ष पद सांभाळले. त्यानंतर हरिष काशीनाथ मने यांची अध्यक्ष पदावर निवड झाली. २१ मार्च १९९७ ते २० मार्च १९९८ या एक वर्षाच्या काळात ते अध्यक्ष होते. त्यानंतर हर्षलता जयंतराव येलमुले यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. गडचिरोली जिल्हा परिषदेच्या त्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या. त्यानंतर संध्या तामदेव दुधबळे यांना अध्यक्ष पदाची संधी मिळाली. २१ मार्च १९९९ ते २० मार्च २००२ या कालावधीत त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर पुन्हा बंडोपंत शंकरराव मल्लेलवार अध्यक्ष पदावर विराजमान झाले. २१ मार्च २००२ ते १७ फेब्रुवारी २००५ असा तीन वर्षाच्या कालखंडात ते अध्यक्ष होते. त्यानंतर समय्या पोचम पसुला यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. पसुला १८ फेब्रुवारी २००५ ते २० मार्च २००७ या कालावधीत अध्यक्ष होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आशाताई पुरूषोत्तम पोहणेकर अध्यक्षपदी विराजमान झाल्या. २१ मार्च २००७ ते ३० नोव्हेंबर २००९ या कालावधीत त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर रवींद्र रंगय्याजी ओल्लालवार अध्यक्षपदी विराजमान झाले. १ डिसेंबर २००९ ते ३० मार्च २०१२ या कालावधीत ते अध्यक्ष होते. त्यानंतर भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. २१ मार्च २०१२ ते २० सप्टेंबर २०१४ या कालावधीत त्या अध्यक्ष होत्या. त्यानंतर परशुराम तुकाराम कुत्तरमारे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. २१ सप्टेंबर २०१४ पासून ते आजतागायत अध्यक्ष पदावर कायम आहेत.
गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निर्मितीपासून आतापर्यंत १६ अध्यक्ष झाले असले तरी अध्यक्ष पदाची संधी १३ लोकांनाच मिळाली आहे. बंडोपंत मल्लेलवार तीनदा, बी. एम. कुरेशी दोनदा तर पेंटाजी रामा तलांडी दोनदा अध्यक्ष पदावर राहिलेत. २०१८ मध्ये निवडणुकीनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकाचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव आहे.