अहेरीत तणाव.. चौकात मृतदेह ठेऊन रास्ता रोको, नेमकं काय घडलं?

By संजय तिपाले | Published: November 29, 2023 05:45 PM2023-11-29T17:45:31+5:302023-11-29T17:50:40+5:30

नागरिकांचा रोष: सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक बंद

youth killed in Surjagad iron ore transport truck collision; angry citizen block the road by placing dead body in the square at aheri | अहेरीत तणाव.. चौकात मृतदेह ठेऊन रास्ता रोको, नेमकं काय घडलं?

अहेरीत तणाव.. चौकात मृतदेह ठेऊन रास्ता रोको, नेमकं काय घडलं?

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागडच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेत तरुण ठार झाला तर एक जखमी आहे. या घटनेनंतर अहेरीत तणाव निर्माण झाला. २८ नोव्हेंबरला मध्यरात्री शहरातील आझाद चौकात मृतदेह ठेऊन नागरिकांनी रोष व्यक्त केला. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर नातेवाईक शांत झाले. २९ रोजी सुरजागड येथील लोहखनिज वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.

अहेरीहून एटापल्लीकडे जाताना २८ नोव्हेंबरला दुचाकीला लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने धडक दिली. यात  सचिन पद्माकर नागुलवार (२३ ) हा जागीच ठार झाला तर शंकर रमेश येडगम (३१ दोघे रा. चिंचगुंडी ता.अहेरी) हे जखमी आहेत.  या घटनेनंतर अहेरी परिसरात तणाव असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येत बंदची हाक दिली. त्यानंतर मध्यरात्री आंदोलन करण्यात आले. 

दरम्यान,  २५ नोव्हेंबर रोजी खमनचेरू येथील ट्रक थांब्यावर सचिन तिवाडे(३२) हा तरुण चालक ट्रकच्या धडकेत ठार झाला. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले पोरकी झाली.दोन दिवसांपूर्वी येनापूर मार्गावर झालेल्या अपघातात रामेश्वर गंगाधर कुंभमवार (वय ३८, रा. अनखोडा, ता. चामोर्शी) व रियांशा धनराज वाढई (वय ८, रा. जामगिरी, ता. चामोर्शी) यांना प्राण गमवावे लागले. याचदरम्यान कोरची परिसरात देखील दोन अपघात झाले. त्यात तिघांना जीव गमावावा लागला. यानंतर एलचिलजवळील अपघात झाला. यात सचिन नागुलवार ठार झाला तर शंकर येडगम जखमी आहे. या घटनांनी नागरिकांनी रोष व्यक्त केला. कुटुंबासह संतप्त नातेवाईकांनी सचिन नागुलवार याचा मृतदेह अहेरीच्या आझाद चौकात ठेऊन मध्यरात्री १२ वाजेनंतर रास्ता रोको आंदोलन केले.  अहेरी ठाण्याचे पो.नि. मनोज काळबांडे यांनी धाव घेत समजूत घातली, त्यानंतर आंदोलन मागे घेऊन मृतदेह अंत्यविधीसाठी नेला.

कुुंटुंबास आर्थिक सहाय्य, दोन सदस्यांना नोकरी 

त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीकडे नागुलवार कुटुंबाला पाच लाख रुपये तसेच कुटुंबातील दोघांना सुरजागडमध्ये नोकरीवर घेण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलन मागे घेतले. जखमी शंकर येडगम याला देखील एक लाख रुपये भरपाई देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. 

Web Title: youth killed in Surjagad iron ore transport truck collision; angry citizen block the road by placing dead body in the square at aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.