दुर्गम भागात ‘आपली कन्या आपल्या भेटी’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:39+5:30

लाहेरीचा परिसर जंगलव्याप्त व नक्षलप्रभावित आहे. या परिसरातील पुरूष वर्ग तालुका स्थळी किंवा लाहेरीसारख्या ठिकाणी विविध कामासाठी येतात. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाविषयी थोडेफार माहित आहे. मात्र महिलावर्ग चूल, मूल व शेतीची कामे यातच गुंतून राहतात. त्यामुळे या महिलांना बाहेरच्या जगाविषयी माहिती नाही.

'Your visit to your daughter' campaign in remote areas | दुर्गम भागात ‘आपली कन्या आपल्या भेटी’ अभियान

दुर्गम भागात ‘आपली कन्या आपल्या भेटी’ अभियान

Next
ठळक मुद्देसमस्या जाणल्या : लाहेरी पोलीस मदत केंद्राच्या महिला पोलिसांनी मुरंगल गावातील महिलांसोबत खेळले खेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
लाहेरी : दुर्गम भागातील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलिसांनी ‘आपली कन्या आपल्या भेटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत पोलिसांनी लाहेरीपासून आठ किमी अंतरावर असलेल्या अतिदुर्गम भाग असलेल्या मुरंगल या गावी जाऊन महिलांची समस्या जाणून घेतल्या. तसेच त्यांच्यासोबत पारंपारिक खेळ खेळून त्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला.
लाहेरीचा परिसर जंगलव्याप्त व नक्षलप्रभावित आहे. या परिसरातील पुरूष वर्ग तालुका स्थळी किंवा लाहेरीसारख्या ठिकाणी विविध कामासाठी येतात. त्यामुळे त्यांना बाहेरच्या जगाविषयी थोडेफार माहित आहे. मात्र महिलावर्ग चूल, मूल व शेतीची कामे यातच गुंतून राहतात. त्यामुळे या महिलांना बाहेरच्या जगाविषयी माहिती नाही. तसेच आरोग्य विषयकही फारशी जनजागृती नाही. अंधश्रध्दा मोठ्या प्रमाणात आहे. परिणामी त्यांचा शारीरिक, मानसिक व आर्थिक विकास खुंटला आहे. कुटुंबाच्या गाड्याचा महिला हा महत्त्वाचा चाक आहे. मात्र हा चाक कमजोर असल्याने संसाराचे गाडे चालविताना अडचणी निर्माण होतात. महिलांना सक्षम करण्याच्या उद्देशाने पोलीस विभागाने ‘आपली कन्या, आपल्या भेटी’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत लाहेरी उपपोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महारूद्र परजने, सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट स्वागत कैलास तसेच महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या टिमने मुरंगल गावाला भेट दिली. महिलांना एकत्र आणून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्यासोबत महिला कर्मचऱ्यांनी संगीत खुर्ची हा खेळ खेळला. पोलीस कर्मचारी आपल्यासोबत खेळत असल्याचे बघून महिलांचा आनंद द्विगुणीत झाला. काही समस्या असल्यास पोलिसांना कळवावे. पोलीस ती समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील, असे आश्वासनही पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी महिला पोलीस कर्मचारी वैशाली चव्हाण, रेश्मा गेडाम, शोभा गोदारी, सोनम लांजेवार, कल्लु मेश्राम आदी उपस्थित होते.

Web Title: 'Your visit to your daughter' campaign in remote areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस