घरजावई युवकाची झाडावर गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 20:02 IST2021-02-23T20:01:41+5:302021-02-23T20:02:06+5:30
तीन वर्षांपासून सासरी घरजावई म्हणून राहात असलेल्या एका छत्तीसगडी युवकाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धानाेरा तालुक्यातील येनगाव येथे घडली.

घरजावई युवकाची झाडावर गळफास घेऊन आत्महत्या
धानोरा (गडचिरोली) : तीन वर्षांपासून सासरी घरजावई म्हणून राहात असलेल्या एका छत्तीसगडी युवकाने झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धानाेरा तालुक्यातील येनगाव येथे घडली. राकेश विश्वनाथ जाळे (२१)असे मृत युवकाचे नाव असून तो मुळचा मर्दगोटा (छत्तीसगड) येथील रहिवासी आहे.
राकेश हा लग्नानंतर तीन वर्षापासून गोडलवाही पोलीस मदत केंद्रांतर्गत येणाऱ्या येनगाव येथील सनी राम कोवा येनगाव यांच्या घरी घरजावई म्हणून राहात होता. त्याला दीड वर्षाचा एक मुलगा आहे. साेमवारी जेवण करून तो घराबाहेर पडला व गावालगतच्या जंगलातील मोहाच्या झाडावर त्याने गळफास लावून घेतला.
त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून पत्नी त्याच्याकडे गेली, परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती पोलीस मदत केंद्र गोडलवाही येथे देण्यात आली. मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला.