This year sowing of groundnut will increase | यंदा भूईमुगाचा पेरा वाढणार

यंदा भूईमुगाचा पेरा वाढणार

ठळक मुद्देचांगल्या पावसाचा परिणाम : २० ऑक्टोबरपर्यंत पेरणीचा योग्य काळ

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : तैैलवर्गीय महत्त्वाचे नगदी पीक म्हणून भूईमुगाची ओळख आहे. यंदा सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पाऊस झाल्याने भूईमुगाच्या पेरणीस विलंब होईल, अशी भीती शेतकऱ्यांमध्ये होती. परंतु पंधरवड्यापासून पावसाने उसंत दिल्याने सध्या शेतकरी भूईमुगाची पेरणी करीत आहेत. त्यामुळे यंदा भूईमुगाचा पेरा वाढणार, अशी शक्यता आहे.
आरमोरी, कुरखेडा, कोरची, धानोरा व अन्य तालुक्यांमध्ये भूईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यंदा चांगल्या पावसामुळे बाह्य मशागतीला बराच वेळ मिळाला. मध्यम, भूसभूशीत वाळूमिश्रीत चिकन मातीचा किनारा कोरची, कुरखेडा, आरमोरी, धानोरा तालुक्यातून वाहणाऱ्या खोब्रागडी, वैैलोचना, गाढवी आदी नद्यांना लाभला आहे. वेगवेगळ्या हवामानाशी जुळवून घेण्याची क्षमता असल्याने दिवसेंदिवस भूईमुगाच्या उत्पादनात वाढ होत आहे.
कुरखेडा तालुक्यातील कढोली, सावलखेडा, सोनेरांगी, उराडी, मालेवाडा व परिसरातील गावात भूईमूगाची पेरणी होते. आरमोरी तालुक्यातील वैरागड, सुकाडा, मोहझरी, मानापूर, देलनवाडी व अन्य तालुक्यातील शेतकरी रबी हंगामात भूईमुगाचे उत्पादन घेतात. भरघोस उत्पादनामुळे भूईमुगाची शेती नफ्याची ठरत आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस भूईमुगाच्या शेतीकडे वळत आहेत.
भूईमुगाचा रबीतील पेरा साधारणत: सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऑक्टोबर महिन्याच्या १५ तारखेपर्यंत होणे आवश्यक आहे. परंतु यंदा उशिरापर्यंत लांबलेला पाऊस लक्षात घेऊन २० ऑक्टोबरपर्यंत पेरणीसाठी अनुकूल काळ आहे. त्यानंतर शेतकऱ्यांनी भूईमुगाची पेरणी करू नये. कारण फुुलाचा काळ कडाक्याच्या थंडीत सापडणार नाही. याची दक्षता घ्यावी लागते, अशी माहिती आरमोरीचे तालुका कृषी पर्यवेक्षक सी. एम. जाधवर यांनी दिली.

Web Title: This year sowing of groundnut will increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.