परिचरच सांभाळतो पशुवैद्यकीय दवाखाना
By Admin | Updated: December 22, 2014 22:46 IST2014-12-22T22:46:30+5:302014-12-22T22:46:30+5:30
स्थानिक पंचायत समितींतर्गत असलेल्या नागेपल्ली येथे जि.प. च्या पशुसंवर्धन विभागामार्फत श्रेणी क्रमांक १ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. मात्र या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या

परिचरच सांभाळतो पशुवैद्यकीय दवाखाना
अहेरी : स्थानिक पंचायत समितींतर्गत असलेल्या नागेपल्ली येथे जि.प. च्या पशुसंवर्धन विभागामार्फत श्रेणी क्रमांक १ चा पशुवैद्यकीय दवाखाना सुरू आहे. मात्र या पशुवैद्यकीय दवाखान्यात कार्यरत असलेल्या पशुधन विकास अधिकारी डॉ. अशोक चव्हाण हे २७ नोव्हेंबरपासून दवाखान्यात गैरहजर राहत आहेत. त्यामुळे या दवाखान्याचा कारभार कार्यरत असलेल्या परिचरालाच सांभाळावा लागत आहे. त्यामुळे नागेपल्ली परिसरात पशुवैद्यकीय सेवेचे तीनतेरा वाजले आहेत.
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत १५ हून अधिक गावांचा समावेश आहे. या १५ ही गावातील पशुवैद्यकीय सेवेचा भार नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यावर आहे. दुर्गम भाग असल्यामुळे या परिसरात खासगी पशुवैद्यकीय सेवेची व्यवस्थाही नाही. त्यामुळे या भागातील पशुपालकांना नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यावरच अवलंबून राहावे लागते. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत परिचर पदावर कार्यरत एस. एस. गोमासे यांना जनावरांवर उपचार करावा लागत आहे. या दवाखान्यात तीन पदे कार्यरत असून पशुवैद्यकीय पर्यवेक्षक नैताम यांना राजाराम येथील पशुवैद्यकीय दवखान्याचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षभरापासून नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांना लसीकरण करण्यात आले नाही. नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत आलापल्ली, पुसूकपल्ली, टेकेमपल्ली, रामय्यापेठा, तुर्कमपल्ली, येनकापल्ली, मोदुमाडगू आदी गावांचा समावेश आहे. नागेपल्लीच्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा नामफलकही गेल्या अनेक दिवसांपासून गायब झाला आहे. पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे येथील सेवा पूर्णत: कोलमडली आहे. (शहर प्रतिनिधी)