अहेरी येथील अडीच किमी रस्त्याचे काम वर्षभर लांबले; धुळीमुळे नागरिक त्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 15:26 IST2025-01-08T15:24:30+5:302025-01-08T15:26:11+5:30
Gadchiroli : अतिशय संथ गतीने सुरू आहे काम

Work on 2.5 km road in Aheri delayed for a year; Citizens suffer due to dust
प्रतीक मुधोळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी: राजनगरी म्हणून प्रसिद्ध अहेरीचे जिल्ह्याच्या राजकारणावर नेहमीच वर्चस्व राहिले आहे. दोन राज्यमंत्री, एक कॅबिनेट मंत्री, आमदार अहेरी शहराला लाभले आहेत. मात्र, मागील अडीच वर्षांपासून अडीच किमीच्या रस्त्यासाठी अहेरीकरांना वाट बघावी लागत आहे.
प्राणहिता पोलिस उपमुख्यालय ते अहेरी या अडीच किमी रस्त्याच्या डांबरीकरणाचे उद्घाटन आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी जानेवारी २०२४ मध्ये केले होते. वर्षभराचा कालावधी उलटूनही रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. कंत्राटदार अतिशय संथ गतीने रस्त्याचे काम करीत आहे. यास बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे बळ आहे. अर्ध्या रस्त्यावर गिट्टी आणि चुरी टाकली आहे तर दुसरीकडे काहीच नाही. एखादे मोठे वाहन गेल्यास सर्वत्र धूळ होत असून, रस्त्यावरील दुकानदार त्रस्त झाले आहे.
चुरीवरून घसरतेय दुचाकी वाहन
- रस्त्यावर चुरी टाकली असल्याने दुचाकीधारक आणि सायकलस्वार अनेकदा घसरून पडत आहेत. काही वर्षापूर्वी मुख्य चौकात अशाच खड्यांमुळे एक महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. रस्त्यावरील दुकानांतील साहित्य व खाद्यपदार्थांवर धूळ बसत आहे.
- राजनगरी ही अख्ख्या राज्यात आदर्श असायला पाहिजे. रस्ते, अन्य सुविधा या परिपूर्ण असायला पाहिजेत. मात्र, अहेरी येथील मुख्य रस्त्याच्या डांबरीकरणाला अडीच वर्षांची प्रतीक्षा आणि एक वर्षापासून काम संथ गतीने सुरू आहे.
- अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने कंत्राटदार आपल्या मर्जीने काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
"दुकानातील साहित्यावर बसणारी धूळ मशीनने साफ करावी लागत आहे. धुळीमुळे ग्राहक येणे कमी झाले आहे. मास्क लावून दुकानात बसावे लागत आहे. खोकल्याचा त्रास वाढला आहे. अत्यंत संथ गतीने रस्त्याचे काम सुरू आहे. याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे."
- यश गुप्ता, दुकानदार अहेरी
"रस्त्यावर फिरणे कठीण झाले आहे. एखादे वाहन गेले की सर्वत्र धूळ उडते. मोकळा श्वास घेणे कठीण झाले आहे. डोळ्यांना जळजळ आणि खोकल्याचा त्रास वाढत आहे. काहींना तर सतत सर्दीचा त्रास होत आहे. कामाची गती वाढविण्याची गरज आहे."
- तुषार पारेल्लीवार, नागरिक अहेरी
"प्राणहिता कॅम्प ते अहेरीपर्यंत डांबरीकरणाचे काम संथ गतीने चालू असल्याची तक्रार आणि माहिती प्राप्त झाली आहे. कंत्राटदारास तोंडी सूचना या अगोदर दिली होती. आता कंत्राटदारास रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याबाबत नोटीस दिली आहे. यानंतरही कामाची गती न वाढल्यास संबंधित कंत्राटदारावर कारवाई होईल."
- बळवंत रामटेके, मुख्य कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, आलापल्ली