जारावंडी-कांदळी पुलाचे काम रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:34 IST2021-03-24T04:34:28+5:302021-03-24T04:34:28+5:30
जारावंडी-कसनसूर रस्त्यावर असणारा हा पूल दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतूक पूर्णत: बंद होते. ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पुलासाठी ...

जारावंडी-कांदळी पुलाचे काम रखडले
जारावंडी-कसनसूर रस्त्यावर असणारा हा पूल दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात पाण्याखाली जातो. त्यामुळे वाहतूक पूर्णत: बंद होते. ग्रामस्थांच्या वारंवार पाठपुराव्यामुळे पुलासाठी निधी मंजूर झाला. बांधकाम विभागाने तातडीने ठेकेदाराची नियुक्ती करून प्रत्यक्षात पुलाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. पावसाळा तोंडावर असताना काम सुरू केलेले होते, परंतु आतापर्यंत हे काम तातडीने सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हे काम सध्या रखडलेल्या अवस्थेत आहे. दुरुस्तीचे काम अपूर्ण असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कांदळी हे गाव जारावंडीपासून दोन किमी अंतरावर एटापल्ली मार्गावर आहे. छत्तीसगड राज्यातून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. बँकेत व तालुक्याला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग उपलब्ध आहे. नवीन पुलाच्या कामाकरिता जुन्या पुलाच्या बाजूला खोदकाम करण्यात आले हाेते. या पावसाळ्यात पुलाकडील माती वाहून गेल्याने पुलाजवळ मोठमाेठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे एसटी बसेस काही दिवस बंद झाले होते. संबंधित विभागाने तातडीने कामाला गती द्यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.