जांभुळखेडा तलाव पाटाचे काम होणार
By Admin | Updated: August 31, 2015 01:13 IST2015-08-31T01:13:18+5:302015-08-31T01:13:18+5:30
मागील ४० वर्षांपासून वन कायद्याच्या कचाट्यात रखडलेले जांभुळखेडा येथील लघु सिंचन तलावाच्या पाटाचे बांधकाम गावकऱ्यांनी श्रमदानातून करण्याचे ठरविले आहे.

जांभुळखेडा तलाव पाटाचे काम होणार
श्रमदानासाठी गावकऱ्यांचा पुढाकार : ४० वर्षांपासून रखडले होते बांधकाम
कुरखेडा : मागील ४० वर्षांपासून वन कायद्याच्या कचाट्यात रखडलेले जांभुळखेडा येथील लघु सिंचन तलावाच्या पाटाचे बांधकाम गावकऱ्यांनी श्रमदानातून करण्याचे ठरविले आहे. रविवारी गावकऱ्यांनी कुदळ, फावडे घेऊन कामाच्या स्थळी दाखल झाले. त्यामुळे अनेक वर्षांपासून रखडलेले काम पूर्ण होण्याची आशा पल्लवीत झाली आहे.
रखडलेल्या तलाव पाट बांधकामाचा प्रश्न निकाली काढण्याकरिता चार ते पाच दिवसांपूर्वी गावात सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी, जि. प. सदस्य अशोक इंदूरकर, मनोहर लांजेवार, दिगांबर मानकर यांना गावकऱ्यांनी पाचारण केले होते.
अनेक वर्षांपासून रखडलेले तलावाचे पाट बांधकाम श्रमदानातून पूर्ण करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केला. त्यानंतर ३० आॅगस्ट रोजी गावकरी कुदळ, फावडे घेऊन नगर पंचायत प्रांगणात हजर झाले. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची कुणकुण लागताच वनपरिक्षेत्राधिकारी सोनवाने उपस्थित झाले. त्यांनी गावकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. सुरेंद्रसिंह चंदेल यांनीही उपवनसंरक्षकांशीही भ्रमणध्वनीवर सकारात्मक चर्चा केली. वन विभागातर्फे प्रत्यक्षात कामाला मंजुरी प्रदान करण्याचे आश्वासन दिले. सदर तलावाच्या सिंचनाचे लाभ जांभुळखेडा, येरंडी, गोठणगाव, मालदुगी येथील शेतकऱ्यांना होणार आहे. उपवनसंरक्षकांशी सकारात्मक चर्चेनंतर जांभुळखेडा येथे ३१ आॅगस्ट रोजी प्रत्यक्ष सर्वेकरिता सर्वेअर व सिंचाई विभागाचे अभियंता येऊन पाहणी करणार आहेत. त्यामुळे ४० वर्षांपासून रखडलेल्या प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता बळावली आहे. अधिकाऱ्यांशी चर्चेदरम्यान सुरेंद्रसिंह चंदेल यांच्यासह सरपंच शिवाजी राऊत, उपसरपंच खुशाल डोंगरवार, वामन हलाल, सायत्रा नैताम, सोनू भट्टड, क्रिष्णा पाटणकर, धोंडगे, मेश्राम, लोहंबरे, नंदेश्वर, दारगाये उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
वनकायद्यामुळे पाट बांधकामाला आली होती आडकाठी
जांभुळखेडा व परिसरातील शेतीच्या सिंचनाकरिता मोठ्या सिंचन तलावाचे बांधकाम १९८० पूर्वी करण्यात आले होते. तलावाचे पाणी शेतांपर्यंत पोहोचविण्याकरिता नहराचे (पाट) बांधकाम सुरू असताना काही जागा संरक्षित वनक्षेत्रात मोडत असल्याची सबब पुढे करीत वन विभागाने सदर काम बंद पाडले होते. सदर काम आजतागायत बंदच होते. तलावाचे बांधकाम होऊनही पाटाअभावी कोणताच लाभ शेतकऱ्यांना होत नव्हता. पाटाचे बांधकाम व्हावे, याकरिता गावकऱ्यांनी अनेकदा शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचबरोबर शिवसेनेच्या वतीने अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. मात्र शासनाकडून आश्वासनांच्या पलीकडे काहीच प्राप्त झाले नाही.