मंडळ कार्यालयांचे काम अपूर्णच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:15+5:302021-03-27T04:38:15+5:30
गडचिरोली : महसूल विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात ४० मंडळ कार्यालयाची उभारणी दीड कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आली होती. काही ...

मंडळ कार्यालयांचे काम अपूर्णच
गडचिरोली : महसूल विभागाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यात ४० मंडळ कार्यालयाची उभारणी दीड कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात आली होती. काही ठिकाणी कामे अपूर्ण अवस्थेत आहे, तर काहींची कामे पूर्ण झाली आहेत.
स्रेहनगरातील वाॅर्डांमध्ये कचराकुंड्या लावा
गडचिरोली : शहरातील स्रेहनगरात कचराकुंडीचा अभाव असल्याने परिसरात सर्वत्र घाण पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. न.प.ने सदर समस्येकडे लक्ष देऊन स्रेहनगरात कचराकुंड्या लावण्याची मागणी होत आहे.
भाजीपाला लागवडीचे क्षेत्र वाढले
गडचिरोली : भाजीपाल्याला चांगला भाव मिळत आहे. त्याचबरोबर, धान पीक निघाल्यानंतर त्याच शेतीत भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे शेतकरी आता भाजीपाला पिकाकडे वळत चालला आहे.
मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा
आरमोरी : शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. ग्रा.प. प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, मागील अनेक दिवसांपासून नागरिकांना त्रास होत असल्याने, सदर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
विभागीय शिक्षण मंडळ गडचिरोलीत द्या
गडचिरोली : नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचे विभाजन करून गडचिरोली येथे नवे शिक्षण मंडळ सुरू करण्यात यावी. पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांचा समावेश असलेले स्वतंत्र शिक्षण मंडळ देण्यात यावे व त्याचे मुख्यालय गडचिरोली ठेवण्यात यावे.
डाक विभागाचे मुख्य कार्यालय द्या
गडचिरोली : केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे डाक विभागाचे प्रधान कार्यालय चंद्रपूर येथे आहे. या कार्यालयामार्फत संपूर्ण गडचिरोली जिल्ह्याचा कारभार चालतो. त्यामुळे प्रधान कार्यालय गडचिरोली येथे देण्यात यावे, अशी गडचिरोलीवासीयांची मागणी आहे.
ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी वाढवा
आरमोरी : तालुक्यातील दुर्गम व ग्रामीण भागातील रस्त्यांची रुंदी अत्यंत कमी आहे. या रस्त्यांवरून एकच वाहन जाऊ शकते. दुसरे वाहन जाते वेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे रस्त्यांची रुंदी वाढविण्याची मागणी होत आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक याेजनेंतर्गत अनेक भागात रस्ते झाले आहेत, पण ते अरुंद आहेत.
जारावंडी-एटापल्ली मार्गाचे रुंदीकरण करा
एटापल्ली : जारावंडी परिसरातील रस्त्यांचा विकास शासनाच्या दुर्लक्षामुळे खुंटला आहे. जारावंडी-एटापल्ली रस्ता अरुंद असल्याने येथे अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण करावे, अशी मागणी होत आहे. परिसरात अनेक समस्यांची भरमार आहे. यात जारावंडी, सरखेडा ते राज्य सीमा रस्त्यावरील बांडिया नदीवरील पुलाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
आरमोरी मार्गावर गतिरोधक निर्माण करा
गडचिरोली : गडचिरोली-आरमोरी या मुख्य मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावर शहरात बसथांबा, व्यावसायिक दुकाने व शाळा असल्याने येथून विद्यार्थी व नागरिकांचे आवागमन असते. त्यामुळे मार्गावर दोन ते तीन ठिकाणी गतिरोधक उभारावे, अशी मागणी होत आहे.
कैकाडी वस्तीत सुविधांचा अभाव
गडचिरोली : शहरालगत चामोर्शी मार्गावर कैकाडी समाजबांधवांची वस्ती आहे. या ठिकाणी अनेक झोपड्या आहेत. मात्र, येथील नागरिक पिण्याचे पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. कैकाडी वस्तीतील नागरिक प्रत्येक निवडणुकीत मतदान करतात. मात्र, त्यांना नागरी सुविधा मिळत नाहीत.
अनेक कुटुंबांकडून शौचालयांचा गैरवापर
भामरागड : अनेक गावांत शौचालयात गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक भरून ठेवतात. त्यामुळे त्याचा गैरवापर होत असल्याचे दिसून आले आहे. परिणामी, शौचालयाचा वापर होत नसल्याने गावात अस्वच्छता पसरत आहे.
वाहतूक नियमांना तिलांजली
सिरोंचा : दुचाकी वाहनावर तीन व्यक्ती बसून वाहन चालवीत असल्याचे चित्र नेहमीचेच झाले आहे. बालकांपासून जबाबदार नागरिकांपर्यंत सर्रास वाहतुकीचे नियम तोडून ट्रिपल सीट जात असतानाचे दृश्य नेहमीच पाहावयास मिळते.
शाळेच्या आवारातील विद्युत तारा हटवा
सिरोंचा : तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांच्या इमारतींवरून गेलेल्या विद्युत तारांमुळे विद्यार्थ्यांना धोका होऊ शकतो. या विद्युत तारा काढण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका होऊ नये, याकरिता तारा हटवाव्यात.
कोरची तालुक्यातील रस्ते दुरुस्त करा
कोरची : तालुक्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील रस्त्यांची मागील अनेक वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावर गवत उगवले असून, अनेक रस्ते खड्डेमय झाले आहेत. गावकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.