स्वस्त धान्य दुकाने चालविण्यास महिला बचत गट सरसावले

By Admin | Updated: October 5, 2014 23:05 IST2014-10-05T23:05:36+5:302014-10-05T23:05:36+5:30

विविध व्यवसाय करणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांनी आता आपले लक्ष स्वस्त धान्य दुकानांकडे वळविले असून जिल्हाभरात सुमारे २०७ स्वस्त धान्य दुकानांची मालकी बचत गटांकडे असून ही दुकाने

The women's saving group has come to run cheap food shops | स्वस्त धान्य दुकाने चालविण्यास महिला बचत गट सरसावले

स्वस्त धान्य दुकाने चालविण्यास महिला बचत गट सरसावले

गडचिरोली : विविध व्यवसाय करणाऱ्या स्वयंसहायता बचत गटांनी आता आपले लक्ष स्वस्त धान्य दुकानांकडे वळविले असून जिल्हाभरात सुमारे २०७ स्वस्त धान्य दुकानांची मालकी बचत गटांकडे असून ही दुकाने अत्यंत यशस्वीपणे चालविली जात आहेत. बहुतांश बचत गटांचे व्यवहार पारदर्शक असल्याने नागरिक व प्रशासनही बचत गटांना पहीली पसंती दर्शवित आहेत.
व्यवसाय सुरू करण्यासाठी फार मोठ्या भांडवलाची गरज भासते. एवढे भांडवल गोळा करणे सर्वसामान्य नागरिकाला शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने बचतगट ही संकल्पना पुढे आणली. या बचत गटांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना व्यवसाय करण्यासाठी सवलतीच्या दरात कर्ज उपलब्ध करून दिले जाते. त्याचबरोबर व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षणही दिले जात असल्याने मागील १० वर्षात महाराष्ट्र राज्यात लाखो व जिल्ह्यात हजारो बचत गट स्थापन करण्यात आले आहेत.
महिन्याचे ४० ते ५० रूपये गोळा केले जातात. १५ महिलांचे महिन्याचे ६०० ते १ हजार रूपये गोेळा होतात. याला जोड बँकेकडून कर्ज घेऊन शेळी पालन, दुग्ध व्यवसाय, कुकूटपालन, शेती कसणे, खतखरेदी करून विकणे, यांच्यासह इतर अनेक व्यवसाय करण्यात येत होते. या व्यवसायातून जिल्ह्यातील हजारो महिलांना रोजगार प्राप्त झाला आहे. सदर व्यवसाय अत्यंत यशस्वीपणे राबवून स्वावलंबी बनल्या आहेत.
गरीब नागरिकांना शासनाच्यावतीने सवलतीच्या दरातील धान्याचा पुरवठा स्वस्त धान्य दुकानांच्यावतीने करण्यात येते. या दुकानात केरोसीनचाही पुरवठा केला जातो. मात्र स्वस्त दुकानदार सवलतीचे धान्य खुल्या बाजारात चढ्या दराने विकतात. त्याचबरोबर केरोसीनही वाहनधारकांना जास्त दराने विकल्या जात होते. यातून स्वस्त धान्य दुकानदार गब्बर बनला असला तरी गरीबांना मात्र हक्काचे धान्य मिळत नव्हते, या स्वस्त धान्य दुकानदारांना वठणीवर आणन्यासाठी शासनाने स्वस्त धान्य दुकानांचे परवाने बचत गटांना प्राधान्याने देण्याचे धोरण अवलंबिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकुण १ हजार १८६ स्वस्त धान्य दुकाने असून त्यापैकी सुमारे २०७ म्हणजेच २५ टक्के दुकानांची मालकी बचत गटांकडे आहे. यामुळे दुकानदारांच्या हेकेखोरीला फार मोठा लगाम लागला आहे. दुकानदारापेक्षा बचत गटांचा व्यवहार अत्यंत पारदर्शक असल्याने नागरिकही बचत गटांच्या मार्फतीने चालविण्यात येणाऱ्या दुकानांच्या सेवेबाबत समाधानी असल्याचे दिसून येत आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The women's saving group has come to run cheap food shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.